चिपळूण; पुढारी वृत्तसेवा :  कोकणातील पर्यटनसह कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी सिंधुरत्न योजनेतून विविध प्रकल्प राबवले जाणार आहेत. ऊस लागवड व त्याला अनुसरून इथेनॉलसारखे अन्य प्रकल्पही उभारले जाणार आहेत. तसेच परशुराम व मार्लेश्वर देवस्थानसाठी प्रत्येकी दोन कोटींचा निधी दिला जाणार असल्याची माहिती सिंधुरत्न समिती सदस्य व माजी आ. प्रमोद जठार यांनी बुधवारी
आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

प्रमोद जठार म्हणाले की, सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून कोकणातील पर्यटन, कृषी, सहकार, मच्छीमार व विविध घटकातील व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामध्ये कोकणातील ऐतिहासीक पार्श्वभूमी तरूण पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 10 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून कसबा परिसरात 100 एकर जागा घेण्याचे नियोजन आहे.

मुंबई गोवा महामार्गाच्या विषयावर बोलताना ते म्हणाले, चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या कंपन्यांमध्ये फेरबदल केल्यानंतर कामाला गती मिळाली. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण नियमित पाठपुरावा करीत आहेत. 2024 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत चौपदरीकरणाचे काम मार्गी लागेल. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, माजी नगरसेवक परिमल भोसले, उद्योजक प्रशांत पटवर्धन, भाऊ कानडे आदी उपस्थित होते.

साबरमतीच्या धर्तीवर वाशिष्ठीचा विकास

राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात वाशिष्ठी नदीतील गाळ उपशासाठी निधीची तरतूद झाली नसली तरी केंद्र सरकारने आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत साडेतीन हजार कोटीचा निधी कोकणसाठी मंजूर केला आहे. या निधीतून वाशिष्ठी नदीचे दोन्ही किनारे गुजरात मधील साबरमती नदीच्या धर्तीवर विकसित करण्याची गरज आहे. तशी मागणी आपण स्वतः करणार आहोत. त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या असल्याचे माजी आमदार जठार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here