दापोली; पुढारी वृत्तसेवा : दापोली मतदार संघातील शिवसेनेच्या सभेला मोठी गर्दी होणार असा असा दावा शिंदे गटाचे नेते करत आहेत. आमदार भरत गोगावले यांच्या मतदार संघ आणि पुणे येथून सध्या शेकडो गाड्या खेडच्या सभेसाठी रवाना झाल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच खेड येथे उद्धव ठाकरे यांची सभा झाली. त्यानंतर आता शिंदे गटाची सभा आज याच ठिकाणी पार पडणार आहे.  रामदास कदम यांनी आजच्या सभेत ठाकरे गटावर निशाणा साधत मागील सभेचा वचपा काढू अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली. खेड सभेसाठी येणाऱ्या लोकांची दापोली मतदार संघातील गावागावात एसटी, खासगी गाड्या, रिक्षा अशा वाहनांची तयारी केली आहे. बाहेरच्या जिल्ह्यातील आणि तालुक्यातील लोक या सभेसाठी येताना दिसून येत आहे. सभेसाठी येणाऱ्या लोकांची प्रवासात जागोजागी जेवण खाण्याची व्यवस्था देखील केलेली आहे.

काही गाड्या या पुणे जिल्ह्यातून देखील महामार्गावर दिसत असून ही सभा स्थानिक मतदारांसाठी की गर्दी जमविण्यासाठी अशी चर्चा देखील होताना दिसून येत आहे. दरम्यान या सभेवर ठाकरे गटाचे माजी आमदार संजय कदम यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ही सभा लोकांची जमवाजमव करून पार पाडली जाणार आहे. मतदार संघातील लोकांची सभा कशी असते ते मागील सभेत आम्ही दाखवून दिले आहे. मतदार संघातील लोक सुज्ञ आहेत. त्यांना पक्षानिष्ठा कळते त्यामुळे मतदार संघातील लोकांची गर्दी कमी होईल यासाठी बाहेरून लोक मागवावी लागत आहेत असा टोला देखील लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here