
खेड; पुढारी वृत्तसेवा : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढी पाडव्याच्या मेळाव्याचा बॅनर पोलीस प्रशासनाने रविवारी (दि.१९) काढण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर मनसे नेते वैभव खेडेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
खेडमध्ये रविवारी (दि. १९) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निष्ठावंतांचा एल्गार सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या पूर्वीपासून शहरात मनसे नेते वैभव खेडेकर यांनी व त्यांच्या समर्थकांनी लावलेले बॅनर चर्चेचा विषय बनले होते. पोलीस प्रशासनाने रविवारी (दि.१९) हे बॅनर काढल्याची कारवाई केल्यानंतर वैभव खेडेकर यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनंतर खेडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही कारवाई शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या दबावापोटी केल्याचा आरोप केला. सुडापोटी मनसे संपवण्यासाठी ते सतत पद, पैसा यांचा वापर करत आहेत. त्यांची दहशत आम्ही झुगारून काम करत आहोत. मनसेला संपवण्यासाठी त्यांनी हे केल्याचा आरोप खेडेकर यांनी केला. राज ठाकरे यांच्याकडे आम्ही याबाबत सतत ही बाब सांगत असून यावेळी तरी राज ठाकरे दखल घेऊन कोकणातून मनसे वाचवण्यासाठी हे प्रकार थांबविण्यासाठी संबंधितांना सांगतील, अशी अपेक्षा यावेळी खेडेकर यांनी माध्यमांसोबत बोलताना व्यक्त केली.