दापोली; पुढारी वृत्तसेवा : खेड येथे शिवसेना-शिंदे गटाची जाहीर सभा असून या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख मार्गदर्शक आहेत. या सभेला लोकांची उपस्थिती असावी यासाठी दापोली आगारातून ८३ एसटी गाड्यांची व्यवस्था शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यात गावागावात प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहेत. प्रवाशांनी या गैरसोईबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

दापोली आगारातून एकूण ८३ एसटी गाड्यांची व्यवस्था या सभेला जाणाऱ्या लोकांसाठी करण्यात आली. त्यापैकी ३१ गाड्या या दापोली तालुक्यासाठी देण्यात आल्या. त्यातील २५ गाड्यांचे नियोजन हे खेड डेपोतून होणार आहे. तर २७ गाड्यांचे नियोजन चिपळूण येथे आहे अशी माहिती दापोली आगार व्यवस्थापक रेश्मा मधाळे यांनी दिली. नागरिकांची कोणतीही गैरसोय केली नाही असे देखील त्यांनी सांगितले. मात्र प्रवाशांनी झालेल्या गैरसोईबाबत एसटी प्रशासन यांच्या कारभारावर नाराजी दर्शविली. अनेक प्रवाशी हे खासगी वाहने करून गेली असुन, काही प्रवाशी दिवसभर बस स्थानकात ताटकळत राहिले. गाड्या नाहीत याची आधी माहिती द्यायला हवी होती आशा प्रतिक्रिया महिला वर्गातून उमटल्या. तसेच वयोवृद्ध प्रवाशांचे देखील या परिस्थितीत भरपूर हाल झाले.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here