चिपळूण : समीर जाधव : अलीकडे मधुमेह व उच्च रक्तदाब रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. माणसाच्या आरोग्याच्या समस्येत हे दोन आजार मोठी अडचण ठरले आहेत. या पार्श्वभूमीवर सावर्डे येथील गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी सावर्डे महाविद्यालयातील केमिस्ट्री विभागप्रमुख प्रा. अश्विनी भाऊसाहेब पाटील यांनी मधुमेह आणि उच्च रक्तदाब रुग्णांसाठी एकच औषध तयार केले असून, या औषधाला भारत सरकारने पेटंट बहाल केले आहे. आजपर्यंत बाजारपेठेत अशाप्रकारचे दोन्ही आजारांसाठी एकच औषध उपलब्ध नाही. त्यामुळे भविष्यात मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना एकच गोळी तयार होणार असून, औषध निर्माण क्षेत्रात हे संशोधन क्रांती करणार आहे.

गुढी पाडव्याच्या निमित्ताने कडूलिंबाला विशेष महत्त्व आहे. वर्षभर चांगले आरोग्य लाभावे म्हणून या दिवशी कडूलिंबाचा रस घेतला जातो. याच पार्श्वभूमीवर मुधमेह आणि उच्च रक्तदाब रुग्णांसाठी हे पेटंट लाभदायक ठरणार आहे. या बाबत गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी सावर्डे येथील महाविद्यालयात केमिस्ट्री विभाग प्रमुख प्रा. अश्विनी पाटील यांना विचारले असता त्या म्हणाल्या, बायलेअर फ्लोटिंग टॅबलेट ऑफ लोसरटॅन अँड मेटफॉरमीन युसिंग नॅचरल पॉलिमर्स या संशोधन कार्यास पेटंट कार्यालय, भारत सरकार यांच्याकडून पेटंट बहाल करण्यात आले आहे.
हेे संशोधन हे औषध निर्माण शाखेतील एक अत्यंत महत्त्वाचे कार्य असून मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे औषध एक संजीवनी ठरणार आहे. अनेक औषधे रक्तात जात नाहीत तोपर्यंत त्याचा योग्य परिणाम मिळत नाही. याचा अभ्यास या संशोधनात करण्यात आला असून त्यावर उपाय म्हणून हे औषध तयार करताना नॅचरल पॉलिमरचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे या औषधाचा मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांवर परिणाम होतो, हे संशोधनात तपासण्यात आले आहे. या संशोधन कार्यात लोसारटॅन नावाच्या ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या औषधाचे इमिडीएट रिलीज तसेच मेटफॉरमीन नावाच्या ब्लड शुगर कंट्रोल करणार्‍या औषधाचे सस्टेन रिलीज लेयर असणारी एक बायलेअर टॅबलेट बनवण्यात आली असून तिच्या ड्रग रिलीजचा अभ्यास करण्यात आला. आजपर्यंत मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना वेगवेगळ्या गोळ्या घ्याव्या लागतात. याचा दुष्परिणाम किडणीवर देखील होतो. साईडइफेक्टस् वाढतात. याशिवाय रुग्णांना दोन प्रकारची औषधे घेणे खर्चिक पडते. पण नव्या संशोधनामुळे भविष्यात या दोन्ही आजारांसाठी एकच गोळी मिळणे शक्य होणार आहे. भारत सरकारने या औषधासाठी आपल्याला पेटंट दिले आहे. मात्र, ही गोळी बाजारात येण्यास अनेक टप्पे पार करावे लागणार आहेत. परंतु मधुमेही आणि उच्च रक्तदाब असणार्‍या रुग्णांसाठी हे औषध महत्त्वाचे ठरेल असा विश्वास प्रा. पाटील यांनी ’पुढारी’शी बोलताना व्यक्त केला.

सिंथेटिक पोलिमर पेक्षा नैसर्गिक पॉलिमर्सचा औषधांच्या रिलीज प्रोफाइलवर कश्या पद्धतीने चांगला परिणाम होतो हे अभ्यासण्यात आले. तसेच नैसर्गिक पॉलिमरच्या वाढत्या कॉन्सन्ट्रेशनचा औषधाच्या रिलीजवर होणारा परिणामही अभ्यासण्यात आलेला असून जो मेटफार्मिंनसारख्या कमी बसॉपशन विंडो असणार्‍या औषधांच्या सस्टेन रिलीज साठी खूप महत्त्वाचा आहे.

या संशोधनात प्रा. पाटील यांच्यासोबत प्रा. श्री मदन पोमाजे,अखिल काणेकर व श्वेता शिरोडकर यांचाही सहभाग होता. या संशोधनाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आ. शेखर निकम, प्राचार्य डॉ. अनिल बत्तासे, सचिव महेश महाडिक आदींनी अभिनंदन केले आहे.

आजपर्यंत मधुमेही आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना बाजारात स्वतंत्र औषधे उपलब्ध आहेत. परंतु, जर या दोन्ही आजारांच्या रुग्णांसाठी एकच गोळी निर्माण झाली, तर औषध निर्माण क्षेत्रात ती क्रांती ठरेल. या गोळीमुळे मधुमेही आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना वेगवेगळ्या गोळ्या घेण्याची गरज भासणार नाही. रुग्णांना कमी औषधे द्यावी लागल्याने त्याचे जास्त साईडइफेक्ट होणार नाहीत. किडणीवर फारसा परिणाम होणार नाही. तसेच खर्चाच्या द़ृष्टीनेही ही गोळी परवडणारी ठरेल व त्यातून रुग्णांचे पैसे वाचतील. अशी गोळी बाजारात आल्यास मधुमेही आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना ती वरदान ठरेल.
– डॉ. सुनील कोतकुंडे









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here