
कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : कुडाळ तालुक्यातील आवळेगाव फोजदारवाडी येथील एका जनावरांच्या गोठ्याला आग लागल्याची घटना घडली. शनिवारी (दि. २५) दुपारी आग लागलेल्या आगीत एक जनावर होरपळून जागीच मयत झाले तर ४ जनावरे गंभीर जखमी झाले. त्यामुळे शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. पशुपालक शेतकरी सत्यवान गणपत कानसे असे आहे. घटनास्थळी पचायत समिती प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी भेट देऊन प्रशासन स्तरावर सहकार्य केले जाईल असे सांगितले. या आगीत गोठा व गवताची गंजीसुद्धा जळून खाक झाली.
आवळेगाव फोजदारवाडी येथील पशुपालक सत्यवान कानसे यांच्या घरानजीक वनवा लागला होता. हा वनवा वाढत जनावरांच्या गोठ्यापर्यत आला. या गोठयात पाच जनावरे होती. यामध्ये म्हैस, रेडे व वासरे याचा समावेश होता. या आगीत एका जनावराचा होरपळून जागीच मृत्यू झाला. पशुपालकही या जनावरांना वाचविण्यासाठी प्रयत्न करताना किरकोळ जखमी झाले याबाबत गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष दादा साईल, सरपंच पूर्वा सावंत, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ सुरेंद्र देसाई ग्रामसेविका पेडणेकर पोलीस पाटील एम पी राठोड, तलाठी मनीषा शिपुकडे, उपसरपंच विवेक कुपेरकर अमित तावडे ग्रामस्थ यांनी भेट दिली.
दरम्यान जो गोठा जळाला त्याला पंचायत समितीमधून गोठा देण्याचे आश्वासन दिले. पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विद्यानंद देसाई याच्याबरोबर झालेल्या चर्चेनुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत मधून आवश्यक ते सहकार्य करण्याचे ठरले या गुरांना पाऊस पडेपर्यंत लागणारा चारा हा ग्रामपंचायत माध्यमातून देण्यासाठी ग्रामपंचायत आवळेगावने पावले उचलली आहेत होरपळलेल्या गुरावर डॉ. सुरेंद्र देसाई यांनी तात्काळ उपचार सुरू केले आहेत.