नासा

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची आता ‘इस्रो’नंतर आता ‘नासा’साठी अमेरिका सफर घडणार आहे. एकूण 9 विद्यार्थ्यांची यासाठी निवड करण्यात आली असून, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ते अमेरिकेला रवाना होणार असल्याचे जि. प. प्रशासनाकडून सांगण्यात आले.

खासगी शाळांच्या स्पर्धेत मराठी शाळा टिकवण्यासाठी सध्या जि. प.तर्फे विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. गुणवत्तावाढीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्याला यशही येत आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञ करण्याचा पाया रोवणे, अंतराळ संशोधनावर जिज्ञासा निर्माण करणे, वैज्ञानिक द़ृष्टिकोन विकसित करणे व नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, यासाठी अमेरिकेतील नासा व भारतातील ‘इस्रो’ या संस्थेला गुणवंत विद्यार्थ्यांची भेट घडवण्याची योजना जि. प. ने आखली. त्यानुसार 27 विद्यार्थ्यांची गेल्या महिन्यात ‘इस्रो’ या संस्थेची सफर घडवण्यात आली.

आता अमेरिका वारीसाठी जि. प. चा शिक्षण विभाग सज्ज झाला आहे. यासाठी लागणारा व्हीसा मंजूर झाला आहे. मुळात अमेरिकेला जायचे असेल तर वर्षभर या गोष्टीसाठी थांबावे लागते. मात्र तांत्रिक गोष्टींवर मात करत महिनाभरात हा व्हीसा मंजूर करण्यात प्रशासनाला यश आले आहे, साधारण 23 मे रोजी 9 विद्यार्थ्यांसहीत जि. प.चे एक शिष्टमंडळ अमेरिकेला जाणार आहे.

या विद्यार्थ्यांमध्ये प्रभुती संतोष घागरूम, धनश्री संजय जाधव, वेदांत विठ्ठल मोरे, अभय शिवराम भुवड, सोनाली मोहन डिंगणकर, आरोही दिनेश सावंत, वेदांत बाबुराव सनये, आशिष अनिल गोबरे, भूषण चंद्रकांत धावडे यांचा समावेश आहे. शिष्टमंडळात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव यांच्यासह शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, आरोग्य अधिकारी यांचा समावेश आहे. यामुळे आता या विद्यार्थ्यांची अमेरिका वारी घडणार असून, राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे.

The post रत्नागिरीतील विद्यार्थ्यांची मेमध्ये अमेरिका सफर! appeared first on पुढारी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here