साडवली; पुढारी वृत्तसेवा : संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे येथील धरण क्षेत्रात रविवारी (दि २६) गवारेडा मृतावस्थेत आढळून आला. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, करंबेळे धरण क्षेत्रात गवारेडा मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती गावचे पोलीस पाटील खाके यांनी वनविभागाला दिली. यानंतर रत्नागिरीचे परिक्षेत्र वनअधिकारी प्रकाश सुतार, संगमेश्वरचे वनपाल तौफीक मुल्ला व वनरक्षक अरूण माळी, वनरक्षक राजाराम पाटील यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

तसेच देवरूखचे पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. कदम यांच्यामार्फतही मृत गव्याची पाहणी केली असता त्याच्या शरीरावरती कोणतीही जखम आढळून आली नाही. त्याचे सर्व अवयव सुस्थितीत असल्याची खात्री करण्यात आल्यानंतर डॉ. कदम यांनी गव्याचे शवविच्छेदन केले. यामध्ये गव्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. या गव्यावर त्याचठिकाणी वनविभागामार्फत अंत्यसंस्कार करण्यात आले. अधिक तपास वनविभागाकडून करण्यात येत आहे.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here