
दापोली; गोविंद राठोड : दापोली आणि खेड या दोन तालुक्यांना जोडणार्या सीमेवर रामगड नावाच्या किल्ल्याचा दुर्ग अभ्यासक संदीप परांजपे आणि पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयाचे पुरातत्त्व अभ्यासक डॉ. सचिन जोशी यांनी अभ्यास आणि मेहनतीच्या बळावर शोध घेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. दापोली तालुक्यातील पालगड या गावाच्या पूर्वेस दापोली-खेड या दोन तालुक्यांना जोडणार्या सीमेवर समुद्रसपाटीपासून अंदाजे 390 मीटर (1,280 फूट) उंचीवर असलेला छोटेखानी किल्ला वसला आहे.
दरम्यान, या किल्ल्याबाबत लोकांना माहिती नाही. या किल्ल्याचा अभ्यास आणि अथक प्रयत्नांनी संदीप परांजपे आणि डॉ. सचिन जोशी यांनी या ऐतिहासिक ठेव्याचा शोध लावला. ‘रामगड’ असे या किल्ल्याचे नाव आहे. दुर्ग अभ्यासक आणि पुरातत्त्व अभ्यासक यांनी शोधलेल्या रामगड किल्ल्यामुळे ऐतिहासिक वारशाच्या इतिहासाला पुन्हा एकदा गती मिळणार आहे.
रामगड हा घेरापालगडचा जोडकिल्ला असून, आजवर या किल्ल्याची स्थाननिश्चिती झालेली नव्हती. महाराष्ट्रात रामगड नावाचे दोन किल्ले आहेत. यातील पहिला रामगड हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात आहे; तर दुसरा रामगड हा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मोडतो. या किल्ल्याची बांधणी कोणत्या काळात झाली. याविषयी आजतागायत कोणालाच माहिती नाही. मात्र, घेरापालगडबरोबरच हा किल्लादेखील बांधला गेला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दोन्ही किल्ल्यांच्या बांधणीत अनेक समान गोष्टी दिसतात. या किल्ल्याचे उल्लेख इ.स. 1728 पासून आढळतात. या किल्ल्याचे उल्लेख असलेली दोन-तीन कागदपत्रे उपलब्ध असून, यातील पहिली नोंद सन 1728 मधील आहे. ही यादी ऐतिहासिक संग्रहांमध्ये प्रसिद्ध झालेली असून, त्यात कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात असलेल्या किल्ल्यांची यादी दिलेली आहे. या यादीत रामगड किल्ल्याचा उल्लेख घेरापालगडबरोबर झालेला असून, तो रामदुर्ग असा येतो.
दोन्ही पत्रे पेशवे दफ्तरातील असून, ती अनुक्रमे 1745 आणि 1818 मधील आहेत. यातील पहिले पत्र कोणी कोणास पाठवले याचा उल्लेख प्रस्तुत खंडातील प्रसिद्ध लेखात नाही; मात्र रत्नागिरीमधील रामगड सिद्दीच्या ताब्यात असावा आणि तो सिद्दीवरील मोहिमेत परिसरातील रसाळगडबरोबर पेशव्यांच्या ताब्यात आला असावा, असे या पत्रावरून समजते. हे पत्र मार्च 1818 मधील असून, या पत्रात ब्रिटिश फौजा पालगड व रामगड येथे पहाटेपासून तोफांचा मारा करत असून, किल्ल्यावर लागलेली आग खूप दुरून दिसत असल्याचे म्हटले आहे. हे पत्र धोंडो विश्वनाथाने निळोपंत पुरंदर यांना पाठवले आहे.