रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : भौगोलिक निर्देशांक (जीआय) मिळालेल्या उत्पादनांमध्ये नोंदणी करण्यात कोकणचा राजा हापूसचा राज्यात दुसरा क्रमांक आहे. डाळिंब पहिल्या, तर द्राक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे.

सातासमुद्रापार पोहोचलेल्या कोकणच्या राजाला जीआय मानांकन मिळाल्यानंतर पाच वर्षांनंतर आता खवय्यांच्या पसंतीची पावती मिळाली आहे. आतापर्यंत कोकणातील १ हजार ६२५ बागायतदार आणि प्रक्रियाधारकांनी हापूससाठी नोंदणी केली आहे. हापूस मोठ्या प्रमाणात निर्यात केला जात असून दर चांगला मिळावा यासाठी बागायतदारही जीआयकडे वळत आहेत.

देशात जीआय मानांकन मिळा- लेली ४२० उत्पादने आहेत. महाराष्ट्रातील ३३ उत्पादनांना जीआय असून त्यात २५ कृषी उत्पादनांचा समावेश आहे. जीआय प्रमाणपत्र देण्यासाठी कोकणातील ३ संस्थांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये कोकण हापूस आंबा उत्पादक विक्रेते सहकारी संस्था, केळशी परीस हापूस उत्पादक संघ आणि देवगड तालुका हापूस उत्पादक संस्थेचा समावेश आहे. आतापर्यंत १ हजार ६२५ आंबा उत्पादक आणि प्रक्रियाधारकांनी जीआय नोंदणी केली आहे. त्यातील कोकण हापूस आंबा उत्पादक संस्थेने ८६६ आंबा बागायतदार आणि १२७ प्रक्रियाधारकांची नोंदणी केली. दरम्यान, जीआय टॅगमुळे कोकण वगळता इतर कोणत्याही आंब्यांना हापूस असे संबोधता येत नाही. यापूर्वी कर्नाटक, आंध प्रदेश किंवा गुजरातचा आंबा हापूस म्हणून विकला जायचा. यामध्ये ग्राहकांची फसवणूक होत होती. या प्रकारामुळे कोकणातील हापूस उत्पादकांचे नुकसान होत होते.

मात्र, आता जीआय मानांकनामुळे हापूस उत्पादकांची फसवणूक कमी होत आहे. त्यामुळे चवीने खाणाऱ्या ग्राहकांनी हापूसला दुसऱ्या स्थानांचे मानाचे पान दिले आहे.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here