मालवण, पुढारी वृत्तसेवा : कोळंब मार्गावरून भरधाव वेगाने जाणारा डंपर तेथील राजन आंगणे यांच्या घरासमोरील दगडी कुंपण तोडून थेट अंगणात घुसल्याची घटना बुधवारी (दि.२९) रात्री घडली. सुदैवाने आंगणे यांच्या अंगणात कोणीही व्यक्ती नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार एमएच ०७ सी ६१३१ या क्रमांकाचा रिकामी डंपर आज रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास कोळंब येथील राजन शंकर आंगणे यांच्या घरासमोरील दगडी कुंपणाला धडकून अपघात घडला. या घटनेने ग्रामस्थानी त्याठिकाणी धाव घेतली. सदर डम्पर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे ग्रामस्थामध्ये बोलले जात होते. ज्या दगडी कुंपणावर डंपर आदळला त्यावर नेहमी लहान मुले खेळत असतात. मात्र आज सुदैवाने मुले त्याठिकाणी नव्हती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. तसेच कुंपण नसते तर डंपर थेट घरात घुसून जीवितहानी झाली असती, अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, यावेळी पोलीस निरीक्षक विजय यादव व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र या घटनेची माहिती पोलिसांना देऊनही उशिरा घटनास्थळी दाखल झाल्याबद्दल ग्रामस्थानी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच डंपर चालकावर कारवाई व्हावी, या मार्गांवरून यापुढे धोकादायक अशी डंपर वाहतूक होता नये, त्यास पोलिसांनी पायबंद घालावा, अशी मागणी ग्रामस्थानी केली.

हेही वाचलंत का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here