देवरुख : पुढारी वृत्तसेवा : वडिलोपार्जित शेतजमीन मिळकतीवर सहहिस्सेदार म्हणून नाव दाखल करून ते मंजुरी करुन देण्यासाठी देवळे येथील मंडल अधिकारी यांनी तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रुपयांची मागणी केली. ही लाच स्वीकारताना बुधवारी दुपारी मंडल अधिकारी उल्हास मुरुडकर यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

या प्रकरणात मंडल अधिकारी उल्हास विश्वनाथ मुरुडकर तसेच तलाठी संतोष महादेव मोघे यां दोघांनाही ताब्यात ‘एसीबी’ने घेतले आहे. तक्रारदार हे देवळे गावातील 29 वर्षांचे शेतकरी आहेत. तक्रारदार यांच्या वडिलोपार्जित शेतजमीन मिळकतीवर तक्रारदार यांचे सहहिस्सेदार म्हणून नाव दाखल करून ते मंजुरीसाठी पाठविण्यासाठी यातील तलाठी सजाचे लोकसेवक संतोष महादेव मोघे यांनी दि. 28 फेब्रुवारी 2023 रोजी मोबाइल फोनची मागणी केली होती.

नोंद मंजूर करण्याकरिता यातील आरोपी मंडल अधिकारी उल्हास विश्वनाथ मुरुडकर यांनी दि. 28 फेब्रुवारी 2023 व दि. 13 मार्च 2023 रोजी 25 हजार रूपयांची लाच रकमेची मागणी केली होती. मागणी केलेली लाच रक्कम 25 हजार रुपये आरोपी लोकसेवक उल्हास विश्वनाथ मुरुडकर (46, मंडल अधिकारी, देवळे, ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी हे बुधवारी दुपारी 1 वा 43 मी. स्वीकारत असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

दरम्यान, या प्रकरणात आरोपी मंडल अधिकारी व तलाठी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकातील पोलिस निरीक्षक प्रवीण ताटे, पोलिस हवालदार कोळेकर, पोलिस नाईक दीपक आंबेकर, पोलिस शिपाई हेमंत पवार, राजेश गावकर, चालक पोलिस नाईक प्रशांत कांबळे यांनी केली.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here