राजापूर; पुढारी वृत्तसेवा : शनिवारी (दि. १ एप्रिल) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अणुस्कुरा घाटात एक चारचाकी खोल दरीत कोसळुन अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात कारचालक जागीच ठार झाला. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांसह पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांचे खोल दरीत उतरुन चालकापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरु होते.

सुनील देसू चव्हाण (वय २७ मुळ – विजापूर, सध्या रा. पाचल) असे मयत कारचालकाचे नाव आहे. ते कोल्हापूरहून पाचल येथे येत असताना अणुस्कुरा घाटामध्ये तीव्र उताराहून (क्र. K A 28 N 1138) ही चारचाकी दरीत कोसळली. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास जवळपास 300 फुट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात कारचालक जागीच ठार झाला. रायपाटण पोलीस दुरक्षेत्रावरुन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांचे खोल दरीत उतरुन चालकाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु होते.

गेल्या काही दिवसांत अणुस्कुरा घाटात वाहन कोसळुन अपघात होण्याची ही दुसरी घटना घडली आहे. काही दिवसांपुर्वी एक चिऱ्याचा भरलेला ट्रक घाटात कोसळुन अपघात घडला होता. त्यावेळी सुदैवाने चालक बचावला होता त्यानंतर आजची अपघाताची घटना. रायपाटण पोलीस या अपघात प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here