चिपळूण; पुढारी वृत्तसेवा :  अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे चीनच्या सीमेलगत कडा कोसळून झालेल्या अपघातात चिपळूण तालुक्यातील जवान शहीद झाला आहे. यामध्ये सुभेदार अजय शांताराम ढगळे (36) हे शहीद झाले आहेत ते मूळचे चिपळूण तालुक्यातील मोरवणे ढवळेवाडी येथील असून त्यांच्यावर सोमवारी शासकीय इतमामात अत्यसंस्कार केले जाणार आहेत.

दरवर्षी या हंगामात तैवान येथे बर्फ वितळतो. यावेळी सैनिकी कारवाईसाठी चिनच्या सीमेलगत रस्ता तयार करण्यासाठी रेकी केली जाते. जवान अजय हे सैन्यातील अभियांत्रिकी विभागात कार्यरत होते. रस्त्यासाठी रेकी करण्यास गेलेले सुभेदार अजय ढगळे व अन्य 5 जणांवर दरड कोसळली. यामध्ये 6 जण सापडले. मात्र, अन्य 5 जवान जखमी झाले. तर सुभेदार अजय ढगळे हे ढिगार्‍याखाली सापडले व त्यात त्यांना हुतात्मा व्हावे लागले. भूस्खलन मोठ्या प्रमाणात झाले आहे. रेकी करण्यास गेलेले अजय ढगळे व त्यांच्या टीमला काही कळण्याआधीच दरड कोसळून ते माती व बर्फाच्या ढिगार्‍याखाली गाडले गेले. त्यांच्या समवेत असलेले अन्य 5 जण बचावले आहेत. गेले सहा दिवस भारतीय सैन्य सुभेदार अजय ढगळे यांचा शोध घेत होते. शनिवारी सकाळी हुतात्मा जवान ढगळे यांचा मृतदेह चिखल व दगड मातीखाली सापडला. त्यानंतर हे वृत्त मोरवणे येथे पोहताच अनेकांनी दुख व्यक्त केले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुली, 2 भाऊ, 4 बहिणी असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव सोमवारी आणले जाण्याची शक्यता असून मोरवणे येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अत्यसंस्कार होणार आहे.

कारगीलमध्येही सहभाग

शहीद जवान अजय ढगळे हे देशसेवेत कार्यरत असताना शहीद झाले आहेत. डीबीजे महाविद्यालयीन शिक्षण घेताना ते चिपळूणमधील माजी सैनिकांच्या मुलांच्या वसतिगृहात होते. त्यांचे वडील शांताराम ढगळे हे देखील सैन्यात होते. काही महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले. शहीद अजय ढगळे हे कारगिल लढाईमध्ये देखील टायगर हिल जिंकणार्‍या बहादूर सैनिकांच्या टीममध्ये होते. असा वीर जवान शहीद झाल्याने तालुक्यातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here