रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  शहराच्या विकासासाठी अनेक योजना राबवल्या जात असून पर्यटनद़ृष्ट्या विकासासाठी 15 कोटी निधी नगर परिषदेला देण्यात आला असल्याची माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचे पुतळे, रत्नागिरीच्या मातीतील सहा भारतरत्नांंचे पुतळे, मेडिटेशन सेंटर तसेच नागपूरच्या धर्तीवर पाण्यावर ऐतिहासिक वारसा दाखवता येईल, असे ‘वॉटर फाऊंटन’ उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. रत्नागिरीच्या विकासासाठी जवळपास शंभर कोटींहून अधिक निधी दिलेला आहे. मात्र पर्यटनद़ृष्ट्या विकास कामांसाठी काही नाविण्यपूर्ण उपक्रम राबवले जाणार आहेत. रत्नागिरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचेे पुतळे उभारले जाणार आहेत. किल्ला येथे शिवसृष्टी उभारण्याच्या द़ृष्ट्यीने आराखडा तयार आहे. सीआरझेडच्या परवानगीसाठी हा आराखडा दिल्ली येथे पाठवण्यात आला आहे. याच ठिकाणी हे पुतळे उभारण्याचे प्रयत्न आहेत. या पुतळ्यांसाठी दीड कोटीचा निधी देण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्याने तब्बल सहा भारतरत्न या देशाला दिले आहेत. या सहाही महान व्यक्तींचे 15 ते 18 फुटी पुतळे उभारले जाणार आहेत. त्याचप्रमाणे याठिकाणी जागतिक दर्जाचे मेडिटेशन सेंटर उभारण्यात येणार आहे. यासाठी पाच कोटींचा निधी नपला देण्यात आला आहे. नागपूरच्या धर्तीवर वॉटर फाऊंटन उभारले जाणार आहे. पाण्याच्या स्क्रीनवर रत्नागिरीतील ऐतिहासिक स्थळे दाखवण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञान चेन्नई येथील एका संस्थेकडे असून चेन्नईतील काही तंत्रज्ञ येत्या 4 एप्रिल रोजी रत्नागिरीत पाहणी करुन हे वॉटर फाऊंटन कोठे उभारायचे या बाबत निर्णय घेतील. वाहनांच्या पार्कींगबाबतही विचारविनिमय होणार असल्याचे ना. सामंत यांनी स्पष्ट केले. रत्नागिरीतील मालगुंड येथील प्राणी संग्रहालयाबाबतही येत्या काही दिवसांत निर्णय होईल, असेही ना. सामंत यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here