
राजापूर; पुढारी वृत्तसेवा: राजापूर शहरवासीयांसाठी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले आहे. या केंद्राचा लवकरच शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. राजापूर शहरासाठी प्रथमच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. राजापूर शहरात शासकीय रुग्णालयासह अनेक खासगी दवाखाने असून शहरवासीयांसाठी स्वतंत्र प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु कऱण्याची मागणी होत होती. शहरातील भटाळी परिसरात एका खासगी इमारतीमध्ये भाडे तत्वावर हे आरोग्य केंद्र सुरु करण्यात येणार आहे.
याबाबत आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार एमबीबीएस क्लासचे एक वैद्यकीय अधिकारी, एक नर्स, लॅबशी संबंधित कर्मचारी अशी काँट्रॅक्ट तत्वावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार आहे. तसेच येथे लसीकरणासह रुग्णांवर उपचार केले जातील. शहरात शासकीय रुग्णालय कार्यरत असताना आता नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु होत आहे.
तालुक्यात ओणी, जवळेथर, करक, सोलगाव, धारतळे, जैतापूर, केळवली, फुफेरे आणि कुंभवडे या ठिकाणी ग्रामीण तालुक्यासाठी ९ प्राथमिक आरोग्य केंद्रे मागील अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. शिवाय काही ठिकाणी उपकेंद्रे देखील सुरु आहेत. शहरात सुरु होत असलेल्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचा राजापूर शहरालगत असलेल्या ग्रामीण भागालाही फायदा होणार आहे. राजापूर वासीयांसाठी आरोग्याच्या दृष्टीने आणखी एक सेवा उपलब्ध होत आहे. त्यामुळे शहरवासीयांतून समाधान व्यक्त होत आहे.
हेही वाचा