
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : मिर्या – नागपूर महामार्गावर साळवी स्टॉप ते जे. के. फाईल्स या दरम्यान रस्त्यावरच अतिक्रमण करून बसलेल्या परप्रांतीय व्यावसायिकांची दबंगगिरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याचा फटका पर्यटक तसेच नागरिकांनाही सोसावा लागत आहे. संबंधित यंत्रणा मात्र सोईस्करपणे याकडे कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे.
साळवी स्टॉप ते अगदी कुवारबावपर्यंत अतिक्रमण करून अनेक व्यावसायिकांनी आपला धंदा मांडला आहे. दोन वर्षापूर्वी जे. के. फाईल ते कुवारबाव दरम्यान असलेली अतिक्रमणे प्रशासनाने उठवली होती. मात्र पुन्हा जैसे थे परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे. साळवी स्टॉप ते जे. के. फाईल्स यादरम्यान अनेक वर्षे परप्रांतीय व्यावसायिकांनी हा रस्ताच काबीज केला असल्याचे दिसून येत आहे. यावर मात्र अजूनही प्रशासनाने कोणतीच भूमिका न घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
या परप्रांतीय व्यावसायिकांची दबंगगिरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याचा त्रास पर्यटक तसेच नागरिकांना सोसावा लागत आहे. या रस्त्याच्या बाजुला फुलझाडे, थंड पाण्याचे माठ विक्रीसाठी ठेवलेले आहेत. रस्त्याच्या साईडपट्टीवर ठेवलेली असल्याने नागरिकांना चालणे मुश्किल बनले आहे. त्याचबरोबर वाहनचालकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.
आठ दिवसांपूर्वी एका परजिल्ह्यातील पर्यटकाची कार याठिकाणी उभी करण्यात आली होती. मात्र अचानक दरवाजा उघडल्याने सात मडकी फुटली. तसेच मंगळवारी एका छोटा मुलगा तेथून जात असताना त्याच्या चुकून पाय लागल्याने मडक्याला तडा गेला. तसेच बुधवारी सुद्धा एका वाहनचालकाचा चुकून दरवाजा लागल्याने एक मडके फुटले. यावरून तेथील विशेषकरून महिलांना पुढे करून हे व्यावसायिक वाद घालतात. या संबंधितांकडून याची नुकसानभरपाई सुद्धा घेतली गेली. मुळात साईडपट्टीवरच ही मडकी असल्याने नेमके चालायचे तरी कुठून , असा प्रश्न पादचार्यांना पडला आहे.