
खेड; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात पोलादपूर बाजूला बुधवारी (दि.५) सायंकाळी ३ वाजण्याच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात चालक जखमी झाला असून ट्रक दरीतून बाहेर काढण्यासाठी सायंकाळी उशिरपर्यंत प्रयत्न सुरू होते.
बुधवारी (दि. ५) सायंकाळी ३ वा. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटातील पोलादपूर बाजूला प्रतापगड दर्शन पॉईंट या ठिकाणी ट्रक (एम एच ०९ एफ एल ३६४३) हा बेळगांव ते माणगाव असा जाणारा ट्रक दरीत कोसळला. या अपघातात ट्रक चालक प्रशांत चंद्रकांत देसाई (वय २८ रा.कोथळी,ता.चिकोडी, जिल्हा बेळगाव) जखमी झाला असून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या अपघाताची माहिती मिळताच कशेडी पोलीस मदत केंद्रातील पोलीस उपनिरीक्षक ए.पी.चांदणे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी समिल सुर्वे व सहकारी यांनी घटनास्थळी पोहचून ग्रामस्थांच्या मदतीने जखमी चालकाला ट्रकमधून बाहेर काढले. त्यानंतर उपचारासाठी पोलादपूर येथे पाठवले. या अपघाताची नोंद करण्याचे काम सायंकाळी उशिरा पर्यंत पोलादपूर पोलीस ठाण्यात सुरू होते.