
राजापूर/चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : तालुक्याच्या पूर्व भागामध्ये शुक्रवारी सायंकाळी जोरदार हजेरी लावल्यानंतर सलग दुसर्या दिवशीही (दि. 8) सकाळी शहरासह पश्चिम भागातील गावांमध्ये अवकाळी पावसाने जोरदारपणे हजेरी लावली. त्यामध्ये सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ जोरदारपणे अवकाळी पाऊस पडत होता. दरम्यान, शुक्रवारच्या सोसाट्याच्या वार्यामध्ये झाड पडून तळवडे येथे तीन वीज खांब कोसळून आणि वीज वाहिन्या तुटल्याने या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता तर गोठणे फिडरवर झाड पडल्याने या फिडरवरील काही गावांमधील वीजपुरवठा खंडित झालेला होता. झाडे पडून काही घरांचे अंशतः नुकसान झाले.
चिपळूण शहरासह ग्रामीण भागात शुक्रवारी सायंकाळी विजांच्या गडगडासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे काही काळ वीज पुरवठा देखील खंडित झाला होता. तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, आंबा व काजू पिकावर प्रतिकुल परिणाम झाला आहे. परिणामी शेतकर्यांना नुकसान सोसावे लागणार आहे.
दरम्यान, ज्या भागांमध्ये झाड पडून वीजपुरवठा खंडित झालेला होता त्या भागामध्ये महावितरण विभागाकडून तत्काळ वीजखांब उभे करणे आणि वीजवाहिन्या जोडण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यातून, शनिवारी दुपारपर्यंत बहुतांश गावातील वीजपुरवठा पूर्ववतपणे सुरू झाल्याची माहिती महावितरण विभागाकडून देण्यात आली. गेले दोन दिवस पडलेल्या अवकाळी पावसानंतर आज दिवसभर कमालीचा राहिलेल्या उकाड्याने सारे हैराण झाले होते.
जिल्ह्यातील काही भागामध्ये तुरळक प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून या पूर्वी वर्तविण्यात आलेला होता. त्याप्रमाणे काल सायंकाळी सोसाट्याचा वारा आणि ढगांचा गडगडाट करीत तालुक्याच्या पूर्व भागामध्ये अवकाळी पाऊस पडला. त्यानंतर शनिवारी सकाळी शहर परिसरासह तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये अवकाळी पावसाने जोरदारपणे हजेरी लावली. त्यामध्ये सुमारे अर्धा तास जोरदारपणे पाऊस पडत होता. दरम्यान, अवकाळी पाऊस पडल्यानंतर दिवसभर हवेतील उष्मा कायम असल्याने झालेल्या उकाड्याने सर्वजण चांगलेच हैराण झाले होते. दुपारपर्यंत स्वच्छ सुर्यप्रकाश असलेल्या हवामानामध्ये सायंकाळी उशीरा पुन्हा एकदा बदल होताना ढगाळ वातावरण तयार झाले होते. त्यामुळे सायंकाळी उशीरा वा रात्री पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.
दरम्यान, शुक्रवारी सायंकाळच्या सोसाट्याच्या वार्यामध्ये झाड कोसळून तळवडे येथे तीन वीज खांब कोसळून आणि वाहिन्या तुटून महावितरणचे नुकसान झाले. त्याचवेळी त्या पसिरातील काही गावांमधील वीजपुरवठाही खंडित झाला होता. वीज खांब उभे करण्यासह तुटलेल्या जोडण्याच्या केलेल्या कार्यवाहीनंतर काही गावांमधील वीजपुरवठा पूर्ववतपणे सुरू झाल आहे. त्याचवेळी गोठणे येथील फिडरवर झाड पडल्यानेही काही गावांमधील शनिवारी सकाळपासून वीजुरवठा खंडित झालेला होता. कोसळलेले झाड बाजूला करूनमहावितरण विभागाकडून गोठणे दोनिवडे फिडरवरील खंडित झालेला वीजपुरवठा पुन्हा एकदा पूर्ववतपणे सुरू केल्याची माहिती दिली.
शुक्रवारी सोसाट्याच्या वार्यासह पलडलेल्या पावसामध्ये करक येथे एका घरावर आणि तालुक्यात सावडाव येथे एका घराव झाड पडून अंशतः नुकसान झाले आहे. त्या घरांच्या झालेल्या नुकसानाचा निश्चित आकडा मात्र, समजू शकलेला नाही.
सहा घरांचे नुकसान
चिपळूण: पुढारी वृत्तसेवा : चिपळूण शहरासह ग्रामीण भागात शुक्रवारी दुपारपासूनच आकाशात काळे ढग जमा झाले होते. दुपारच्या वेळी तालुक्याच्या पूर्व विभागात खेर्डी, शिरगाव, आलोरे ,पोफळी या परिसरात वादळी वार्यासह पावसाचा शिडकावा झाला होता. यामध्ये टेरव येथील काही घरांचे छप्पर कोसळून नुकसान देखील झाले होते. अनंत भागोजी खांबे, शिवराम भिकाजी जाधव, वासंती शंकर शिगवण, गीता लक्ष्मण पालकर, चंद्रकांत बाबा पालकर,दीपाली दीपक जाधव यांच्या सहा घरांचे नुकसान झाले आहे. त्यांचे महसूल विभागाने पंचनामे देखील केले आहेत.
रात्री दहा वाजण्याच्या सुमारास चिपळूण शहर परिसरासह ग्रामीण भागात ढगांच्या गडगडासह विजांच्या लखलखाटात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे रस्ते देखील निसरडे बनले. विशेष म्हणजे वादळी वार्यामुळे झाडावर तयार असलेले आंबे निखळून पडले. याशिवाय काजू पिकाचे देखील नुकसान झाले आहे. आंबा व काजू बागातदारांनी फळ पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावेत, अशी मागणी केली आहे.
The post राजापूर, चिपळुणात अवकाळी पावसाचा तडाखा appeared first on पुढारी.