अलिबाग : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र शासानाने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यासाठी खारघर येथे आलेले सर्व श्री सदस्य हे माझ्या कुंटुंबाचे सदस्य आहेत. रविवारी (दि.१६) उष्माघाताने काहींचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही अत्यंत क्लेशदायक घटना असून, आम्ही सारेजण आपदग्रस्तांसोबत आहोत, अशी सहवेदना ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आज (दि.१७) एका निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.

श्री सदस्यांचा हा परिवार देशविदेशात पसरला आहे. या पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काही श्री सदस्यांना त्रास झाला आणि त्यातील काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेषदायक आहे. माझ्या कुटुंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे. आपल्याच कुटुंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित आहे. माझे हे दुःख शब्दांत व्यक्त करण्यापलिकडचे आहे, असे आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी निवेदनात म्हटले आहे.

मृत्यू झालेल्या या सदस्यांच्या कुटुंबियांची आणि माझी वेदना सारखीच आहे. श्री सदस्य परिवाराची एकमेकांच्या सोबत राहण्याची पिढ्यानपिढ्यांची पंरपरा आहे. त्यानुसार आम्ही सारेजण या आपद्ग्रस्तांसोबत कायम आहोत. यातील मृतांना सद्गती लाभो, तसेच त्यांच्या कुटुंबाला हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. झाला प्रकार दुर्दैवीच होता. त्याचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे, असेही धर्माधिकारी यांनी म्हटले आहे.

हेही वाचा 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here