
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) प्रस्तावनुसार कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर या चार जिल्ह्यांतील 8 समुद्रकिनार्यांवर पर्यटनाला चालना देण्यासाठी समुद्रकुटी उभारण्याला मान्यता देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली, कुणकेश्वर रत्नागिरी जिल्ह्यातील आरे-वारे, गुहागर, रायगडमधील दिवेआगार, वर्सेली आणि पालघर जिल्ह्यातील बोर्डी, केळवा या आठ समुद्रकिनार्यावर समुद्रकुटी (बीच शॅक्स) उभारण्यात येणार आहेत.
कोकणाच्या सौंदर्यकरणात समुद्राने मोठी भर घातली आहे. 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा कोकण किनारपट्टीला लागला आहे. देश विदेशातील पर्यटना कोकणची किनारपट्टी भुरळ घालत आली आहे. स्वच्छ सुंदर आणि शांतता पूर्व परिसर हा येथील वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो. पर्यटनाच्या दृष्टीने ही किनारपट्टी महत्त्वाची आहे. त्यामुळे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली, कुणकेश्वर रत्नागिरी जिल्ह्यातील आरेवारे, गुहागर, रायगडमधील दिवेआगार, वर्सेली आणि पालघर जिल्ह्यातील बोर्डी, केळवा या आठ ठिकाणी ही योजना अमलात आणली जाणार आहे.
कोकणाला समृध्द किनारपट्टी लाभली आहे. या सागर किनारपट्टीचा पर्यटनात्मक व्यावसायिक वापर करण्यासाठी गोव्याच्या धर्तीवर पर्यटन योजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी एमटीडीसीने केली होती. ही योजना राबविताना पर्यावरणाला पूरक सुविधा आणि योजनांचा वापर करण्यात यावा, असे प्रस्तावित करण्यात आले होते. तसेच या सुविधाबोरबर रोजगारांच्या संधीही उपसब्ध करुन देण्यात येणार होती. त्यानुसार कोकणातील स्थानिक रहिवाशांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने बीस शॅक्स उभारणत येणार आहे. स्थानिक व्यक्तींना यात 80 टक्के जागा राखीव असतील. या कुट्यांचे तीन वर्षाकरिता वाटप केले जाईल. किमान पंधरा फुटाची लांबी आणि रुंदी तसेच बारा फूट उंचीची ही कुटी असणार आहे. प्रत्येक कुटीमध्ये बसण्यासाठी पंधरा ते वीस फूट छत टाकता येईल, अशी व्यवस्था असणार आहे. सकाळी सात वाजेपासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत या कुटी सुरू ठेवण्यास मान्यता दिली जाईल.
महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आणि पर्यटन संचालनालयाने निश्चित केलेल्या जागांवर या कुट्या उभारण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. या परवानगीसाठी लाभार्थ्यांना 15 हजार रुपयांचा निधी ना परतावा तत्त्वावर घेण्यात येणार आहे.