सिंधुदुर्ग : पुढारी वृत्तसेवा – मौजे डेगवे येथील मोयझरवाडीमध्ये राहणाऱ्या दिनेश सडवेलकर यांचे घरच्या मागे बागायतीला लागून शौचालय आहे. या शौचालयासाठी शोषखड्डा म्हणून जमिनीत बांधण्यात आलेल्या आयताकृती, सिमेंटच्या टाकीमध्ये आज पहाटेच्या वेळी एक गवा पडला. सकाळी ९ वाजण्याच्च्या सुमारास याची कल्पना आल्यानंतर त्यांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधला.

सदर घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी वन विभागाची रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळाचे निरीक्षण केले असता एक पूर्ण वाढ झालेला अंदाजे ७ वर्षांचा नर गवा टाकीमधून बाहेर यण्यासाठी धरपड करत असल्याचे दिसून आले. गव्याला कोणत्याही प्रकारची मोठी जखम वा इजा नसून गवा सुखरूप असल्याचे निदर्शनास आले. परंतु सदरची टाकी ही १०x१५ फूट मापाची, अंदाजे १५ फूट खोलीची असल्याकारणाने गवा सहजासहजी वर येऊ शकत नव्हता. शेवटी गव्याची सुटका करण्यासाठी त्या टाकीची एक बाजू जेसीबीच्या सहाय्याने खोदून गव्याला मार्ग मोकळा करून देण्याचा पर्याय वन विभागाच्या रेस्क्यू टीमने शोधून काढला. त्यानुसार जेसीबीच्या सहाय्याने खुदाई करून टाकीची एक बाजू मोकळी करण्यात आली आणि गव्याची नैसर्गिक अधिवासात सुखरूप सुटका करण्यात आली.

वन विभागाचे सदरचे रेस्क्यू ऑपरेशन हे उपवनसंरक्षक सावंतवाडी एस. नवकिशोर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, बांदा वनपाल अनिल मेस्त्री, वनरक्षक संतोष देसाई, वनरक्षक संतोष मोरे, वनमजूर आत्माराम सावंत, रामदास जंगले या वन विभागाच्या रेस्क्यू टीमसोबतच डेगवे सरपंच राजन देसाई, सदस्य राजेश देसाई, मधुकर देसाई व उपस्थित डेगवे ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या मोलाच्या सहकार्याबद्दल वन विभागाने डेगवे ग्रामस्थांचे आभार मानले.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here