पुढारी ऑनलाईन: राजापूर तालुक्यातील बारसू-सोलगाव परिसरामध्ये प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाची उभारणी करण्याच्या हालचालीना वेग आला आहे. या परिसरामध्ये माती परिक्षणाच्या सर्व्हेक्षणाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या प्रकल्पाविरोधात स्थानिकांनी कालपासून आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान राज्यात उष्णतेची लाट कायम असून, खारघर घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची सरकारने काळजी घ्यावी, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ट्विटरवरून केले आहे.

राष्ट्रवादी नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “रिफायनरी प्रकल्प विरोधी आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. आंदोलक त्यांच्या भूमिकेवर ठाम असून यामध्ये महिला आणि मुलांचा देखील समावेश आहे. राज्यात अद्याप उष्णतेची लाट कायम आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या दुर्घटनेत १५ जणांना उष्माघाताने आपला जीव गमवावा लागला आहे. त्याची पुन्हा पुनरावृत्ती होणार नाही, याची सरकारने काळजी घ्यावी.”

सरकारला आवाहन करणारे ट्विट अजित पवार यांनी ‘सीएमओ’ महाराष्ट्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे. रिफायनरीसाठी सुरू असलेले सर्वेक्षण स्थगित करावे. मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा करून मार्ग काढावा. सरकार आणि पोलिसांनी बळाचा वापर करून  सर्वेक्षण करू नये, अशी विनंती देखील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारला केली आहे.

नाणार परिसरामध्ये रिफायनरी प्रकल्पाची उभारणी करण्याला ग्रामस्थांकडून विरोध  झाला. आता यानंतर राज्‍य सरकारकडून  बारसू-सोलगाव परिसरामध्ये त्याची उभारणी करण्याची चाचपणी सुरू झाली आहे. त्यालाही या परिसरातील ग्रामस्थांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून रिफायनरी प्रकल्पाच्या उभारणीच्या हालचाली काहीशा थंडावलेल्या होत्या. मात्र, पुन्हा एकदा या हालचालींनी वेग घेतला आहे.

हेही वाचा:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here