
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : उत्तरेकडील शीतलहरींनी तळकोकणात पाठ फिरविल्याने आता कोकण किनारपट्टी भागात उकाड्यात वाढ झाली आहे. आगामी आठवडा हा उष्ण लहरींचा असणार आहे. आता कोकणातील मळभी स्थिती ओसरू लागली असून, तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे खर्या अर्थाने कोकण किनारपट्टीवर मे महिन्याचा उन्हाळा सुरू होण्याच्या उंबरठ्यावर आहे.
पुढील दोन दिवसांनंतर संपूर्ण कोकणात विस्तारत जाणार्या उष्ण लहरींनी तापमानात आणखी वाढ होणार आहे. तसा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या आठवड्यापासून अवकाळीचा जोर होता. तरी त्यास कमी दाबाच्या क्षेत्रांचा अडथळा आहे. सध्या गुजरातकडून किनारपट्टीच्या भागामध्ये उष्ण वार्यांचे प्रवाह येत आहेत. त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीतील जिल्ह्यात तापमान वाढीची शक्यता आहे.
कोकणासहीत अन्य विभागात सूर्य अक्षरश: आग ओकत असल्यासारखी उष्णता जाणवत आहे. गेल्या काही दिवसांत मुंबई आणि उपनगरात मोठ्या प्रमाणात उष्णता वाढत आहे. अंगाची लाहीलाही होत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारपासून मुंबईसह कोकणातील 4 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.