राजापूर; पुढारी वृत्तसेवा : “महाराष्ट्र पेटवण्याची भाषा करण्यापेक्षा आधी लोकांच्या घरातील चुली पेटवा. स्वतःची चूल पेटवण्यासाठी मुंबईत गुजराती, मारवाडी लोकांना ठेके देणारे कोकणचे भले काय करणार? असा सवाल करत आमदार नितेश राणे यांनी उध्दव ठाकरेंवर टीका केली. कोकणचा विकास करण्यासाठी कोकणवासीयांना हा प्रकल्प हवा आहे. तो रद्द करण्याची हिम्मत कुणाच्यात नाही, असा घणाघात आमदार नितेश राणे यांनी राजापूर जवाहर चौक येथील रिफायनरीच्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्च्यावेळी केला.

यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले की, या प्रकल्पातून उध्दव ठाकरेंना खोके हवे आहेत आणि हा विरोध केवळ खोक्यांसाठीच आहे. उध्दव ठाकरेंकडे फक्त आमदार राजन साळवी आहेत, जे कधीच कुणाचे झाले नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

प्रकल्प हवा असेल तर घराबाहेर पडा. आज जर तुम्ही घराबाहेर पडला नाहीत तर तुमची भविष्यातली पिढी तुम्हाला शिव्या घालेल, हा प्रकल्प आपल्याला भविष्यासाठी हवा आहे, असे माजी खासदार निलेश राणे यानी सांगितले. ज्यावेळी बारसूची जागा उध्दव ठाकरे यांनी रिफायनरी प्रकल्पासाठी सुचवली, त्यावेळी त्याप्रकल्पावरुन पुढे घडणाऱ्या घटनांचा विचार केला होता का? आणि आजच त्या लोकांची तुम्हाला कशी आठवण आली असा खोचक सवालही, निलेश राणे यांनी केला. उध्दव ठाकरेंना कोकणशी काहीही देण-घेण नाही. ते येतील, माथी भडकावतील, हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे. मात्र आम्हाला येथील जनतेची माथी शांत ठेवायची आहेत. त्यासाठी आम्ही या प्रकल्पाच्या समर्थनार्थ आलो आहोत. प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात समर्थन आहे. ते सर्वांना दिसावे यासाठी ही आजची सुरुवात आहे. भविष्यात या प्रकल्पाच्या समर्थनासाठी मोठी सभा आयोजित करुन हा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही निलेश राणे यांनी दिली.

हेही वाचा : 









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here