ऱाजापूर : पुढारी वृत्तसेवा – प्रस्तावित बारसू प्रकल्पाच्या सुरु असलेल्या माती परीक्षणला विरोध करणाऱ्या स्थानिक आंदोलकांचा छळ केल्याचा आरोप स्थानिक आंदोलकांनी केला. त्या विरोधात गोवळ येथील श्री नवलादेवी मंदिराजवळ सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून उपोषणाला सुरुवात केली आहे. मात्र या उपोषणाची माहिती प्रशासनासह पोलीस प्रशासनाला देण्यात आलेली आहे का नाही ते मात्र कळू शकले नव्हते.

बारसूच्या प्रस्तावित सड्यावर गेल्या काही दिवसांपासून माती परीक्षणाचे काम सुरु आहे. त्याला स्थानिक ग्रामस्थांचा कडाडून विरोध झाला आहे. बारसूच्या सड्यावर रिफायनरी उभारणार असल्याने प्रकल्प विरोधक आक्रमक झाल्याचे मागील काही दिवसांत पहायला मिळाले. माती परीक्षणाचे काम थांबविण्यासाठी सरसावलेले आंदोलक आणि पोलीस प्रशासन यांच्यात झटापट झाल्याचे सर्वांनी पाहिले होते. संघर्षातून पेटलेले बारसू धगधगत असतानाच शनिवारी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बारसूचा दौरा करीत शासनाला रिफायनरी प्रकल्प लादू देणार नाही तर प्रसंगी महाराष्ट्र पेटवू असा इशारा दिला होता.

दुसरीकडे रिफायनरीच्या समर्थनार्थ राजापुरात सभेसह तहसील कार्यालयावर एक मोर्चा काढला गेला होता. त्या मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार निलेश राणे कणकवलीचे आमदार नितेश रचा, माजी आमदार प्रमोद जठार, राजन तेली यांच्यासह हनिफ मुसा काझी शिवसेनेच्या शिंदे गटाचे तालुकाप्रमुख अश्पाक हाजू आदींनी केले होते. त्यानंतर पेटलेल्या बारसूची धग कायम असतानाच आता आंदोलकांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. सुरु असलेल्या माती परीक्षणाच्या कामाला विरोध केला म्हणून आंदोलकांची झालेली धरपकड, त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे, करण्यात आलेल्या तडीपारी यामुळे आंदोलक संतापले आहेत.

त्या विरोधात आता गोवळच्या निनादेवी मंदिराजवळ सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून स्थानिक ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. सुमारे २००-३०० स्थानिक प्रकल्प विरोधक उपोषणस्थळी उपस्थित आहे.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here