
parshuram ghat
चिपळूण : पुढारी वृत्तसेवा: अचानक झालेला अवकाळी पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात रस्त्यावर माती आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. या महामार्गावरील वाहतूक पहाटेपासून बंद झाली आहे. अनेक वाहने घाटात अडकून पडले आहेत. पर्यायी मार्ग म्हणून चिरणीमार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे.
चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने अतिशय अवघड टप्प्यातील नऊशे मीटरचे काम सुरू आहे. त्यासाठी दररोज दुपारी बारा ते सायंकाळी पाचपर्यंत १० मेपर्यंत घाट बंद ठेवण्यात येणार आहे. हे काम सुरू असताना सोमवारी रात्री जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे घाटातील माती महामार्गावर आली यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
संबंधित ठेकेदार राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्याकडून वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. माती बाजूला केली जात आहे. मात्र सद्यस्थितीत घाट बंद ठेवण्यात आला आहे.