
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : बंगालच्या उपसागरातील मोचा चक्रीवादळाच्या चक्राकार स्थितीने गुजरातसह आंध्रप्रदेशातील कमी दाबाचा पट्टा निवळला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या उष्ण लहरींचा प्रभाव कोकण किनारपट्टीवरही होऊ लागला आहे. गेला आठवडाभर उष्ण लहरींनी कोकणात नागरिकांच्या अंगाची लाही लाही होऊ लागली आहे.
शनिवारी सकाळी १० वाजता रत्नागिरी जिल्ह्यात तापमानाचा पाऱ्याने ३९ अंश सेल्सिअसपर्यंत मजल मारली होती. दुपारी १२.३० वाजता जिल्ह्यातील तापमान ४० अंश सेल्सिवरही उच्चांकी नोंदविले. गेला आठवडाभर तापमापकाचा पारा असाच उसळत असून रात्रीच्या कमाल तापमानही चढेच राहिले. त्यात शनिवारी रात्री वीज प्रवाहही खंडित होत रहिल्याने सर्व सामान्य नागरिकांची होरपळ सुरूच होती. गेले दोन दिवस उन्हाचा ताप वाढत आहे. एकीकडे मळभी स्थितीने कोरडे हवामान तर दुसरीकडे उष्णलहरींनी वाढलेल्या तापमानाने कोकणातील मे महिना तापदायक ठरू लागला आहे. वाढत्या तापमानाने किनारी भागात बापीभवनाचा वेगही वाढून किनारी वाऱ्याना उन्हाची साथ मिळून शीतल वाऱ्याना उष्णतेचा दाह वाढल्याने किनारी भागातही उष्मा वाढू लागला आहे. शनिवारी ठाणे जिल्ह्यात ३९, पालघरमध्ये ३८, रायगडाच ४१, रत्नागिरीत ३९ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
गेले दोन दिवस कोकण किनारपट्टी भागात तामानाचा दाह वाढला असून तापमानाने ३६ अंश सेल्सिअसच्या वरच नोंदी झाल्या आहेत. आगामी आठवडाही तापमानातील वाढ कायम राहणार असून मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पूर्व मोसमीच्या सरींनी उष्ण लहरींतून सुटका होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. वाढत्या तापमानाने दुपरच्या वेळी झळांनी रस्त्यावरची वर्दळ ही कमी झाली आहे. त्यामुळे बाजारपेठेतील गर्दीही कमी झाली आहे. वाढत्या तापमानाने उष्माघाताच्या आजारात वाढ होऊन आरोग्यावरही परिणाम होण्याच्या शक्यतेने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभाग आणि प्रशासनाने केले आहे.