रत्नागिरी; दीपक शिंगण : कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस कधी सुरू होणार, याची प्रतिक्षा अखेर संपली आहे. मुंबईतून ट्रायलरनसाठी निघालेली वंदे भारत एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर दाखल झाली आहे. मुंबईतून पहाटे निघालेली रेल्वे सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी स्थानकावर दाखल होऊन निर्धारित मडगाव स्टेशनकडे रवाना झाली. कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याच्या दृष्टीने रूट ट्रायल तसेच स्पीड ट्रायल अशा दोन प्रकारच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत.

वंदे भारत एक्सप्रेसची ‘ट्रायल रन’ कोकण रेल्वे मार्गावर आज मंगळवारी पहाटे साडेपाच वाजल्यापासून सुरू झाली. मुंबईतील सीएसएमटी टर्मिनस येथून निघालेली वंदे भारत एक्सप्रेस कोकण मार्गावर दाखल झाली. चाचणी दौड यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई सीएसएमटी ते मडगाव मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. वंदे भारतमुळे सध्याची तेजस एक्सप्रेस बंद होते की, वेळापत्रक बदलून सुरूच ठेवली जाणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. आतापर्यंत ज्या मार्गांवर वंदे भारत सुरू झाली त्या ठिकाणी आधीची कोणतीही ट्रेन बंद न करता सुरू राहिली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील नव्याने सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमुळे तेजस व अन्य कोणतीही रेल्वे बंद केली जाणार नसल्याचे समजत आहे.

दरम्यान, दुपारी अडीच वाजता चाचणीसाठी धावलेली वंदे भारत एक्सप्रेस गोव्यात मडगाव जंक्शनला पोहोचल्यानंतर तिथून परतीचा प्रवास सुरू होऊन रात्री ११ वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचणार आहे. चाचणी दरम्यान रूट ट्रायल तसेच स्पीड ट्रायल या दोन प्रकारच्या चाचण्या होणे अपेक्षित आहेत. या चाचणीसाठी पुन्हा चाचणी फेरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईपासून वीर पर्यंत वंदे भारत एक्सप्रेससाठी दुहेरी मार्ग असल्यामुळे वीर पर्यंत दोन्ही मार्गांवर रोड ट्रायल होईल, असे अपेक्षित आहे. ही चाचणी पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसच्या सेवेचे लोकार्पण करतील, अशी सूत्रांची माहिती आहे.

हेही वाचा : 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here