खेड, पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी येथे दि.२५ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक दिवसाचा दौरा असून त्या दौऱ्याची झळ बुधवारी दि.२४ रोजी खेड तालुक्यातील खेड – सापिर्ली बस मधील प्रवाशांना सोसावी लागली. खेड स्थानकातून सायंकाळी ५ वाजता सोडलेली बस सापिर्ली येथून पुढे रत्नागिरीत साहित्य घेऊन उद्या पाठवायची असल्याने पुन्हा फिरवून आणून तब्बल पावणे सात वाजण्याच्या सुमारास सोडण्यात आल्याने संतप्त प्रवाशांनी या कारभाराविषयी लेखी तक्रार केली आहे.

खेड बसस्थानकातून दररोज चार वाजता सुटणारी खेड – सापिर्ली बस( एम एच १४ बीटी ३००२) ही बुधवारी दि.२४ रोजी एक तास उशिरा सायंकाळी ५ वाजता सोडण्यात आली. चालक एस.एल. इंगोले व वाहक पी. व्हीं. धरू हे बस घेऊन जात असताना खेड येथून भरणेनाक्याच्या दिशेने निघालेली बस अचानक प्रभारी आगार व्यवस्थापक नंदकुमार जाधव यांनी चालकाला फोन करून पुन्हा बसस्थानकात बोलावून घेतली. सुमारे एक तास अंतर गेलेली बस पुन्हा स्थानकात आणल्याने प्रवासी संतप्त झाले. त्या नंतर तब्बल दोन तास बस स्थानकात थांबवून ठेवण्यात आली होती. काही प्रवाशांनी चौकशी केली असता त्यांना सांगण्यात आले की, खेड तहसिलदार यांच्या कार्यालयातील काही साहित्य रत्नागिरी येथे या बस ने उद्या न्यायचे असल्याने अचानक बस परत बोलावण्यात आली तर मुख्यमंत्री यांचा उद्या रत्नागिरी दौरा असल्याने वरिष्ठ पातळीवरून अचानक आदेश आल्याची माहिती खेड आगारातून प्रवाशांना देण्यात आली. परंतु या प्रकारामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी मात्र खेड बसस्थानकात राज्य परिवहन महामंडळाच्या कारभाराचा जाहीर निषेध केला व तसे लेखी निवेदन आगार प्रमुख यांना दिले. त्या नंतर सुमारे पावणे सात वाजण्याच्या सुमारास बस सापिर्ली मार्गावर सोडण्यात आली.

खेड – सापिर्ली ही बस दुर्गम भागात जाणारी गाडी असून वस्तीची बस असल्याने वेळेत सुटणे आवश्यक असते. महिला, वृद्ध, शाळकरी मुले, कामावरून परतणारे लोक यांना त्यामुळे वेळेत घरी पोहोचता येते. मात्र बुधवारी दि.२४ रोजी केवळ मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यामुळे आम्हाला खेड स्थानकात दोन तास रखडावे लागले आहे, ही बाब गंभीर असून त्याची दखल घेऊन मुख्यमंत्री व राज्य परिवहनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराला जबाबदार असणाऱ्या लोकावर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही करत आहोत असे या बस मधील प्रवासी गौतम तांबे म्हणाले आहेत.

हेही वाचलंत का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here