नाते; पुढारी वृत्तसेवा : गेले चार दिवस रायगड किल्ला परिसरामध्ये अपघातांचे सत्र सुरू आहे. आज (दि. ४) दुपारी रायगड किल्ला परिसरात सुरू झालेली तुफान पर्जन्यवृष्टी व वादळामुळे दरड कोसळल्याची घटना घडली. या घटनेत सोलापूरच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. प्रशांत गुंड (वय 28) असे तरुणाचे नाव आहे.

या संदर्भात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रशांत गुंड या तरुणाने आपल्या सहकारी मित्रांसमवेत आज (दि. ४) दुपारी रायगड किल्ला चढण्यास सुरुवात केली होती. दुपारी तीन नंतर रायगड किल्ला परिसरामध्ये तुफान पर्जन्यवृष्टी व वादळ सुरू झाले होते. या काळातच रायगडा किल्ल्यावर पायरी मार्गावर दरड कोसळली. ही दरड किल्ला चढून जाणाऱ्या प्रशांत गुंड याच्यावर पडल्याने दरडीखाली सापडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

गेले चार दिवसात हा तिसरा अपघात असून किल्ले रायगड या संदर्भात शासनाकडून नेमण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध पथकांमुळे या अपघात ग्रस्त शिवभक्तांवर तातडीने उपचार करणे शक्य झाले तरी तिन्हीही शिवभक्तांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संध्याकाळी उशिरा त्याचे पार्थिव प्रथम पाचाड येथे वैद्यकीय तपासणी केल्यावर नंतर महाड येथे सेवाविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. चार दिवसातील या दुर्दैवी घटनांबद्दल पाचाड परिसरासह महाडमध्ये तीव्र दुःख व हळहळ व्यक्त होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here