
दोडामार्ग; पुढारी वृत्तसेवा : दोडामार्ग तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष तथा शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख लवू मिरकर (५०) यांचे रविवारी (दि. ४) संध्याकाळी अल्पशा आजराने निधन झाले. बांबोळी गोवा येथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली. किडनी व हृद्यरोगाने ते गेल्या दोन महिन्यांपासून आजारी होते. महिनाभरापूर्वीच त्यांच्या आईचे निधन झाले होते. त्यांच्या मृत्यूमुळे मिरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
गेल्या पंधरा वर्षाहून अधिक काळ दोडामार्ग तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. तालुक्यातील व्यापाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने ते नेहमी प्रयत्नशील असत. दोडामार्गच्या सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातही त्यांचे भरीव योगदान राहिले आहे. ते शिवसेनेचे दोडामार्ग शहरप्रमुख म्हणूनही होते. कसई-दोडामार्ग नगरपंचायतीवर पहिल्या टर्म मध्ये आपल्या पत्नी सुषमा मिरकर यांना नगरसेविका म्हणून निवडून आणण्याची किमया त्यांनी करून दाखविली होती. पिंपळेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळाचे काही काळ त्यांनी अध्यक्ष व सचिवपद भूषविले होते. सध्या ते मंडळाचे सदस्य म्हणूनही कार्यरत होते. त्यांच्या निधनाने दोडामार्गच्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ, भावजय, पुतणे, पुतणी असा मोठा परिवार आहे.