जागतिक पर्यावरण दिन विशेष , नार्वेकरवाडी

चिपळूण; सुनील दाभोळे : चिपळूणपासून केवळ आठ ते नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या पाचाड गणेशखिंड येथील नार्वेकरवाडी हे ठिकाण सध्या पक्ष्यांचे गाव म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करीत आहे. गणेशखिंड परिसरात छोट्याशा घाटीमध्ये एका वळणावर नार्वेकरवाडी सुरू होते. नितीन नार्वेकर व त्यांचे कुटुंबीय यांनी या ठिकाणी त्यांच्या खासगी मालकी जागेत नैसर्गिक जंगलासह कृत्रिम जंगलही निर्माण केले आहे, ते केवळ पक्षी आणि प्राण्यांसाठीच.

पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी सर्वच जीवांचा मोठा सहभाग असतो. 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा होत आहे. गेल्या काही वर्षांचा अभ्यास करता ग्लोबल वॉर्मिंगमुळे संपूर्ण पर्यावरण असंतुलित झाले आहे. या मागचा वेध घेतला असता वृक्षतोड, भूगर्भातील पाणीसाठा कमी होणे या प्रमुख गोष्टी असल्याचे सांगितले जाते. पर्यावरणाची संतुलन साखळी राखण्यात सजीवांमध्ये प्रामुख्याने कीटकांपासून पक्ष्यांपर्यंत सर्वच जीवांना महत्त्व आहे.

व्यावसायिक असलेल्या नार्वेकर यांनी या भागात आपला छोटासा व्यवसाय केवळ स्वत:ला गुंतवून ठेवण्यासाठी सुरू ठेवला आहे. व्यवसायाची काही किरकोळ जागा वगळता प्रत्यक्षात मात्र संपूर्ण जागेत निर्माण केलेल्या कृत्रिम व नैसर्गिक वनक्षेत्रात पक्षी व प्राण्यांसाठी मोठ्या प्रमाणात विविध सुविधा निर्माण केल्या आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत पक्षी व प्राण्यांना मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते.

सध्या जंगलतोड होत असल्याने पाणीसाठे कमी होत चालले आहेत. हे सजीव नागरी वस्तीकडे पाण्यासाठी भरारी मारताना दिसून येत आहेत. ही बाब लक्षात घेऊनच नार्वेकरवाडीमध्ये पक्ष्यांसाठी कृत्रिम पाणवठ्याबरोबरच वृक्षसंपदेची लागवड करून त्यांच्या नैसर्गिक खाद्याची निर्मिती केली आहे.
हा त्यांचा उपक्रम एवढा यशस्वी झाला आहे की, पाण्यासाठी येणारे साठहून अधिक प्रकारचे विविध पक्षी नार्वेकरवाडीमध्ये मुक्तपणे संचार करताना आढळून येतात. पक्ष्यांबरोबरच काही जंगली प्राण्यांचा देखील नार्वेकरवाडीत मुक्तपणे वावर असतो.

एकूणच नार्वेकर कुटुंबीयांनी पक्षी व जंगली प्राण्यांसाठी उभारलेली नार्वेकरवाडी आज पक्षी निरीक्षकांचे खास आकर्षण ठरले आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी नार्वेकर यांनी उचललेले हे पाऊस कौतुकास्पद ठरत आहे.

The post जागतिक पर्यावरण दिन विशेष : पाचाडमध्ये साकारलीय पक्ष्यांची ‘नार्वेकरवाडी’ appeared first on पुढारी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here