रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  सुधारित कायदा झाल्यानंतर आतापर्यंत एकूण 75 नौकांवर दंडात्मक कारवाई झाली. नुकत्याच संपलेल्या हंगामात बेकायदेशीर मासेमारी करणार्‍या 69 नौकांवर जोरदार दंडात्मक कारवाई झाली. नौकांवरील या कारवाईतून 61 लाख 9 हजार 810 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सुधारित कायद्यानुसार सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त नागनाथ भादुले यांनी अभिनिर्णय अधिकारी म्हणून ही दंडात्मक कारवाई करून शासनाला महसूल मिळवून दिला.

महाराष्ट्र राज्य सागरी मासेमारी अधिनियमात 23 नोव्हेंबर 2021 रोजी सुधारणा झाली. या सुधारणांनुसार अभिनिर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त यांच्यासमोर सुनावणी सुरु झाली. पूर्वी अभिनिर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार काम पाहत होते. या प्रक्रियेमुळे बेकायदेशीर मासेमारी करणार्‍या नौकांवरील दंडात्मक कारवाई किंवा या प्रकरणाची सुनावणी होण्यात विलंब होत होता. आता मात्र सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्तांसमोरच सुनावणी होऊन दंडात्मक कारवाईचा निर्णय होऊ लागल्याने तो वेळेत होऊन शासनाला महसूल मिळू लागला. रत्नागिरी जिल्ह्यातून तब्बल 61 लाख 9 हजार 810 रुपयांचा महसूल नौकांवरील दंडात्मक कारवाईतून मिळाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला 167 कि.मी. चा समुद्रकिनारा असून या समुद्रात मासेमारी करणार्‍या यांत्रिकी आणि बिगर यांत्रिकी अशा 3 हजार 961 मच्छीमार नौका आहेत. यातील 3 हजार 519 यांत्रिकी आणि 442 बिगर यांत्रिकी नौका आहेत. मासेमारी हंगामात वेगवेगळ्या पद्धतीने अवैध मासेमारी केली जाते. सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त विभागातील परवाना अधिकार्‍यांनी नुकत्याच संपलेल्या हंगामात 69 नौका पकडल्या.या संदर्भातील सुनावनी सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त तथा अभिनिर्णय अधिकारी नागनाथ भादुले यांच्यासमोर झाली.

वेगवेगळ्या पद्धतीने अवैध मासेमारी

यामध्ये बंदी कालावधीत मासेमारी करणे, परवाना नसलेल्या ठिकाणच्या समुद्रात मासेमारी करणे, 40 एमएमची जाळी, बुलट्रॉलींगने मासेमारी करणार्‍या नौकांवर मत्स्यव्यवसाय विभागाकडून कारवाई केली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here