रत्नागिरी: पुढारी वृत्तसेवा : कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गालगत जाळण्यात आलेल्या कचऱ्याचा धूर लगतच्या रेल्वे टनेलमध्ये आज (दि.५) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पसरला. त्यामुळे डाऊन मंगला तसेच अप सावंतवाडी दिवा एक्सप्रेससह अन्य काही गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. याबाबत माहिती मिळताच रत्नागिरी येथील क्षेत्रीय रेल्वे प्रबंध कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले.

कोकण रेल्वे मार्गावर (Konkan Railway) निवसर स्थानकानजीक असलेल्या रेल्वे टनेलजवळ कचरा जाळण्यात आला होता. त्याचा धूर येथे जवळच असलेल्या बोगद्यात पसरला. याच दरम्यान घटनास्थळावरून दिल्ली एरणाकुलम मंगला एक्सप्रेस जात होती. या धुरामुळे मंगला एक्सप्रेससह त्याचवेळी अप दिशेने जाणारी दिवा सावंतवाडी एक्सप्रेस अडकून पडली.

दिवा- सावंतवाडी गाडी दुपारी बारा वाजल्यापासून तर हजरत निजामुद्दीन ते एरणाकुलम दरम्यान धावणारी मंगला एक्सप्रेस दुपारी एक वाजल्यापासून अडकून पडली. या दोन्ही गाड्या निवसरला मार्गावर अडकून पडल्यामुळे याचा फटका याचवेळी या मार्गावरून आलेल्या इतर गाड्यांना देखील बसला. यामुळे या गाड्यांना एक ते अडीच तास थांबावे लागले.

एरणाकुलम एलटीटी दुरंतो एक्सप्रेस, मडगाव निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस, मडगाव सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस, अप दिशेने धावणारी मारू सागर एक्सप्रेस, दिवा सावंतवाडी एक्सप्रेस, सीएसटी मडगाव मांडवी एक्सप्रेस, अमृतसर कोचुवेली एक्सप्रेस या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. तर या सर्व गाड्या त्यांच्या निर्धारित वेळेपेक्षा विलंबाने धावत होत्या.

हेही वाचा 









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here