साडवली; पुढारी वृत्तसेवा : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा व दाभोळे पंचक्रोशीतील अनेक गावांमध्ये आज सोमवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला होता. अखेर रात्री ८ वाजल्यानंतर महावितरणकडून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. महावितरणच्या या अनागोंदी कारभारामुळे साखरपा व दाभोळे पंचक्रोशीतील नागरिकांचे फार मोठे हाल झाले असल्याचा आरोप येथील नागरिकांकडून करण्यात आला आहे. वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे कार्यालयीन कामकाजातदेखील अडथळे निर्माण झाले.

गेले काही दिवस तालुक्यात प्रचंड उन्हाचा तडाखा जाणवत आहे. त्यामुळे गरमीने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. त्यातच साखरपा दशक्रोशीतील गावांमध्ये वीजपुरवठा आज सोमवारी दिवसभर खंडीत झाल्याने वयोवृद्धांसह लहान मुले, गरोदर स्त्रिया, आजारी रुग्ण यांना फार मोठा त्रास सहन करावा लागला. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न जागोजागी उभा राहिला. सद्यस्थितीत रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम चालू असून त्यासोबत विजेचे पोल देखील उभे करण्याचे काम दाभोळे व साखरपा पंचक्रोशीत चालू आहे.

या कामाच्या दरम्यान रस्त्यावरील झाडे तोडत असताना तिवरे मेढे येथील पावर हाऊस नजीक जंगलात पडलेला पोल महावितरणच्या उशिरा लक्षात आल्याने वीजपुरवठा पूर्ववत करण्यात उशीर झाला असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून समजते. दरम्यान, महामार्गावरील विजेच्या कामासाठी ठराविक वेळ देण्यात यावा जेणेकरून वीज ग्राहकांची गैरसोय होणार नाही याचा विचार करून वीज पुरवठा खंडित होणार नाही यासाठी महावितरणने जबाबदारीने लक्ष द्यावे, अशी मागणी वीज ग्राहकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here