
ओरोस; पुढारी वृतसेवा : प्रादेशिक हवामान विभाग,मुंबई यांच्याकडून मिळालेल्या पूर्वसूचनेच्या अनुषंगाने अरबी समुद्रात ‘बिपर जॉय’ नावाचे चक्रीवादळ तयार झालेे असून या वादळामुळे 8 ते 9 जून या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये. तसेच जे मच्छीमार मासेमारीसाठी समुद्रात गेलेले असतील त्यांनी किनारी परत यावे. या कालावधीत समुद्र किनारी वेगाने वारे वाहणार असल्याने नागरिकांनी तसेच पर्यटकांनी समुद्रकिनारी जाणे टाळावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. (Biparjoy Cyclone)
सिंधुदुर्गसह कोकण किनारपट्टी भागात वादळी सदृश्य परिस्थितीमुळे प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली असून 8 ते 10 जून दरम्यान वादळी वार्याचा (Biparjoy Cyclone) इशारा दिला आहे. त्यामुळे पाऊस लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Rain In Maharashtra)
बंगालच्या उपसागरात येत्या दोन-तीन दिवसात वादळी सदृश्य परिस्थिती निर्माण होणार असल्याचा भारतीय हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे मान्सून आणखी 7 ते 8 दिवस लांबण्याची शक्यता आहे. केरळमध्ये 4 जून रोजी येणारा पाऊस अजून दाखल न झाल्यामुळे सिंधुदुर्गसह कोकणात पावसाची आणखी आठ दहा दिवस वाट पहावी लागणार आहे. पाऊस लांबल्यामुळे शेतीची कामेही काहीशी खोळंबली असून सिंधुदुर्गसह काही जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. यावर्षी हवामान खात्याने 96 टक्के पावसाचा अंदाज दिला आहे. जूनचा पहिला आठवडा संपत आला तरी पावसाचा एक थेंबही नाही.मोसमी पाऊस काही भागात पडून गेला परंतु जिल्ह्यात उष्णतेच्या लाटा अजून आहेत. तीस ते पस्तीस डिग्रीपर्यंत उष्णता वाढली असून आठ ते दहा जून दरम्यान चक्रीवादळ परिस्थिती निर्माण होणार असल्याने व त्या दृष्टीने पोषक वातावरण तयार होत असल्याने प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत. कोकणसह कर्नाटक, गोवा, गुजरात समुद्रकिनारी भागात हे चक्रीवादळ येणार असल्यामुळे यंत्रणा सतर्क झाली आहे. (Biparjoy Cyclone)
8 जून पूर्व मध्य अरबी समुद्र आणि पश्चिम मध्य आणि दक्षिण अरबी समुद्रालगतच्या भागांवर वादळी वार्याचा वेग 90 ते 100 किमी. प्रतितास राहून 110 किमीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे आणि संध्याकाळपासून ते 95ते105 किमी. प्रति ताशी राहून 115 किमी. प्रतितास होण्याची शक्यता आहे. याच परिसरात 8 जून रोजी कर्नाटक-गोवा-महाराष्ट्र किनार्यावर आणि जवळून 40-50 किमी. प्रतितास वेगाने वारा वाहून त्याचा वेग 60किमी.पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. (Weather Update)
9 जून मध्य अरबी समुद्रात वार्याचा वेग 105ते 115 किमी. प्रतितास राहून 125 किमी.पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे आणि त्याच भागात 9 जूनच्या संध्याकाळपासून वार्याचा वेग 125ते 135 किमी. प्रतितास राहून 150 किमी. प्रतितास होण्याची शक्यता आहे. दक्षिण अरबी समुद्राच्या लगतच्या भागात 50-60 किमी. प्रतितास वेगाने वारा वाहून त्याचा वेग 70 किमी. प्रतितास एवढा वाढण्याची शक्यता आहे. कर्नाटक-गोवा-महाराष्ट्र किनार्यावर आणि जवळून 40-50 किमी प्रतितास वेगाने वारा वाहून त्याचा वेग 60 किमी.पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. 10 जून मध्य अरबी समुद्रावर वादळी वार्याचा वेग ताशी 125 ते 135 किमी. प्रति तास राहून 150 किमी. पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दक्षिण अरबी समुद्राच्या लगतच्या भागांमध्ये आणि उत्तर कर्नाटक-गोवा-महाराष्ट्र किनार्याजवळील वार्याचा वेग 40 व 50 किमी. प्रति ताशी राहून 60 किमी.पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता | Biparjoy Cyclone News
जिल्ह्यात 8 जून रोजी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असून 9 व 10 जून रोजी गडगडाट होवून पाऊस पडण्याची, विजा चमकण्याची व 30 ते 40 प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच 7 जून रोजी रात्री 11.30 पर्यंत वेंगुर्ला ते वास्को समुद्रकिनारी 2.3 ते 3.2 मीटर च्या लाटा उसळणार आहेत अशी माहिती हैद्राबाद या संस्थेकडून प्रसारित करण्यात आली आहे.
हेही वाचा