
राजापूर; पुढारी वृत्तसेवा : राजापूर तालुक्यातील करकमधील अर्जुना धरणावर गेलेल्या कामगारांची गाडी धरणात कोसळल्याची घटना घडली. या घटनेत दोघेजण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. इतर काही जखमींना रायपाटण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अन्य जखमींमध्ये एक कामगार अत्यावस्थ असल्याची देखील माहिती आहे. मृतांसह जखमींची नावे अद्याप समजू शकली नाहीत. (Ratnagiri)
अर्जुना धरणामध्ये काम करणारे १० कामगार बुधवारी (दि. १४) सायंकाळी धरणावर फिरण्यासाठी गेले होते. सायंकाळी साडेसहाच्या आसपास अचानक त्यांची चारचाकी धरणात कोसळली. यामध्ये दोघाजणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य कामगार जखमी झाले आहेत. सुदामकुमार (वय २८) असे मृताचे नाव असून दुसऱ्या व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकले नाही. जखमींना तात्काळ रायपाटण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये सुर्यकुमार बीन (मूळ रहिवासी : बिहार ), उकाश कोरे (मूळ रहिवासी : सांगली), समरपाल कश्य (वय २९, मुरादाबाद युपी), राहुल गणेश वाडे (वय ३३ मिरज), हिराकुमार बीन, लहुकुमार बीन, दिपककुमार बीन, मकसुदन अशी या घटनेतील जखमींची नावे आहेत. यातील तीन कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना कोल्हापूरला तर दोघा जखमींना रत्नागिरीला अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती समजताच, राजापूरच्या तहसीलदार श्रीमती शितल जाधव, राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, उपनिरीक्षक उबाळे यांच्यासह पोलीस प्रशासन ग्रामीण रुग्णालय रायपाटण दाखल झाले. अपघाताचे वृत्त समजताच अनेकांनी रायपाटण ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली. दरम्यान अपघातातील मयत आणि जखमींची संपुर्ण नाव समजत नव्हती त्यांची आधारकार्ड वरुन ओळख पटविण्याचे काम सुरु होती.
हेही वाचा