चिपळूण शहर; पुढारी वृत्तसेवा :  नागरिकांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद व्हावा या हेतूने सह्याद्री निसर्ग मित्र मंडळ आणि चिपळूण नगर परिषद यांच्या विद्यमाने मंगळवारी शहरामध्ये दोन ठिकाणी कापडी पिशव्या उपलब्ध करून देणारे मशिन बसविण्यात आले आहे. पाच रुपये नाममात्र किंमतीत पाच किलो वजनाची क्षमता असलेल्या पिशव्या वेडिंग मशिनच्या माध्यमातून आता ग्राहकांना मिळणार आहे.

पर्यावरण व निसर्गाला घातक ठरणारे प्लास्टिक आजच्या घडीला ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढविणारे ठरत आहे. अतिउष्णता निर्माण होण्यास वृक्षतोड, पाणीसाठा कमी होणे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात टाकाऊ प्लास्टिकमुळे उष्णतेचे उत्सर्जन होत आहे. परिणामी, निसर्ग व पर्यावरणाचे संतुलन बिघडविण्यात प्लास्टिकचाही मोठा वाटा आहे. नागरिकांनी कमित कमी प्लास्टिक वस्तूंचा वापर करावा यासाठी शासनाकडून जनजागृती अभियान सुरू आहे. असे असतानाही अनेक बेजबाबदार नागरिक विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्यांची मागणी करताना दिसून येत आहेत.

ही बाब लक्षात घेता नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये या हेतूने सह्याद्री निसर्ग मित्र मंडळ आणि चिपळूण नगर परिषद यांच्या माध्यमातून मंगळवारी शहरातील जुना बसस्थानक बाजारपेठ परिसर व विजय मेडिकल सोसायटी येथे कापडी पिशव्या ग्राहकांना पाच रुपये या माफक किंमतीत देण्यासाठी वेडिंग मशिन बसविण्यात आले आहे. पाच रुपयाचा एक कॉईन अथवा एक रुपयांची पाच कॉईन किंवा दोन रुपये दोन अधिक एक असे एकूण पाच रुपये मशिनमध्ये टाकल्यानंतर ही पिशवी उपलब्ध होणार आहे.

नागरिकांचा बेजबाबदारपणा

सह्याद्री निसर्ग मित्र मंडळाकडून प्लास्टिक मुक्तीसाठी विविध अभियान राबविले जाते. यामध्ये शहरात प्लास्टिकच्या माध्यमातून विक्री केलेल्या खाद्यपदार्थांचे रिकामे प्लास्टिक व बाटल्या टाकण्यासाठी लोखंडी जाळीच्या कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. तसेच छोट्या वाहनातून टाकावू प्लास्टिक जमा केले जात आहे. तरीदेखील बेजबाबदार नागरिक अद्यापही प्लास्टिकच्या बाटल्या व अन्य साहित्य गटारात टाकताना दिसून येत आहेत. तसेच फळ विक्रेते व काही ग्राहक प्लास्टिक पिशव्यांचा राजरोस वापर करताना दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here