
File Photo
खेड; पुढारी वृत्तसेवा : मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास निधी (एफआयडीएफ) योजनेंतर्गत दापोली तालुक्यातील हर्णे येथील मत्स्यबंदराच्या बांधकामासाठी २०५.२५ कोटी रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेनेचे कार्यकर्ते व माजी नगरसेवक सतीश चिकणे यांनी दिली. ते म्हणाले की, आमदार योगेश कदम हे दापोली मतदारसंघाचे नेतृत्व करण्या अगोदरपासूनच या विषयासाठी आग्रही भूमिका मांडत होते..
हर्णे बंदराचा विकास साधण्यासाठी शासन दरबारी वेळोवेळी अथक पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला अखेरीस आताच्या सरकारच्या काळात यश मिळाले आहे. अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या कोकणातील सर्वात मोठ्या हर्णे बंदराचा विकासरुपी कायापालट होणार आहे. मतदारसंघातील कोळी बांधवांना मत्स्य व्यवसायासंदर्भात भेडसावणाऱ्या विविध समस्या सुटणार आहेत. यामुळे मासेमारी व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे अशी माहिती सतीश चिकणे यांनी दिली.
गोवा किंवा अलिबाग येथील बंदरांप्रमाणे सर्व सोयीसुविधा तसेच व्यावसायिक बोटींची व्यवस्था या बंदरावर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या मध्यामतून करण्यात येणार आहे. अशी माहिती सतीश चिकणे यांनी दिली.