ठाणे : रमाकांत मुकादम-पाटील : भाऊच्या धक्क्यापासून १० मैलावर, रेवसपासून तीन तर पिरवाडीपासून दोन मैलावर रामदास बोट दुर्घटना घडली. १७ जुलै २०२३ रोजी या दुर्घटनेस ७६ वर्षे होत आहेत, खारेपाटातील हजारो चाकरमानी आजही या दुर्घटनेच्या आठवणी जागवतात…

निसर्गाच्या रौद्र रुपापुढे मानव आजपर्यंत फिकाच पडत आला आहे परंतु झुंजी मानव त्यास पुन्हा पुन्हा कवेत घेऊ पहात असतोच. कधीही बुडणार नाही असा टेंभा मिरवणारे टायटॅनिक जहाज पहिल्याच सफरीत न्यू फाऊंडलंडच्या सामुद्रधुनीत एका हिमनगास टकरून दुभंगले आणि हजारो प्रवासी दुर्घटनाग्रस्त झाले. रामदास दुर्घटना वादळी रंग न ओळखल्याने अवसच्या उधाणी लाटांच्या जबड्यात विसावली. मानवी टेंभ्यास जणू एक चपराकच मिळाली. नुकताच या दुर्घटनाग्रस्त टायटॅनिक जहाजाचे समुद्रतळी १३ हजार फुट खोलीवर असलेले अवशेष पाहण्यासाठी ओशनगेट या पाणबुडीमार्फत गेलेले हौशी पर्यटकही तिच्याच अवशेषांजवळ विसावले. एकंदरीत ही निसर्गाचीच किमया असली तरी मानवी चुकांचा परामर्ष त्यापाठीमागे आहे. भारतात १७ जुलै १९४७ रोजी अशाच दुर्घटनाग्रस्त झालेल्या रामदास बोटीचे स्मरण जणू आजही रायगडातील खारेपाटात होत आहे.

१७ जुलै १९४७ काळा दिवस

या दिवशी साधारण सातपासूनच रामदास भाऊच्या धक्क्यावरील नांगरांना बिलगून होती. गटारी अमावस्येचा तो दिवस. खाडीपट्ट्यात या दिवसाला फार महत्त्व, त्यामुळे रेवस, सासवणे, हाशिवरे, शिरवली, किहिम, नागाव ते अगदी रेवदंडा – श्रीवर्धनपासूनचे चाकरमानी या दिवसाच्या आनंदासाठी कुटुंबांकडे निघाले होते. जवजवळ एक ते दीड तासाने रेवस धक्क्यावर पोहोचणार होते. पावसाच्या रिपरिपीने तिन्ही डेकवर ताडपत्र्या शाकारल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना निरोप देणाऱ्या नातेवाईकांना त्यांचे दर्शनही आड झाले होते. सकाळी ८ वाजता बोटीवरील शिड्या आत ओढल्या. रामदास बंदर सोडण्याचा भोंगा वाजला. नांगराचे दोर सोडले गेले. आणि काही वेळेतच रामदास बोट तिरकी उसळी घेत सागरी दिशेने आपल्या प्रवासास निघाली. धक्क्याचा सागरी क्षेत्र पार करताना वादळ पावसाचे रंग बदलू लागले. रामदास लाटांवर हेलकावू लागली. प्रवाशांतही किलबिलाट सुरू झाले. लाटांचे तुषार ताडपत्र्यातून आत झेपावू लागले. बोट अवसच्या रौद्र लाटांशी सामना करताना काश्याच्या टंगलपर्यंत पोहोचली. साधारण नऊच्या सुमारास या ट्रॅगलच्या चुंभाटी लाटांनी रामदासची धाव रोखली आणि एका जबरदस्त लाटेने ती एका बाजूला कलंडली, भेदरलेले प्रवासी सैरभैर होऊन जीव वाचविण्याचा प्रयत्न करू लागले. काहींनी तर सागरात उड्या घेतल्या. अनू.. त्या रौद्र लाटेपुढे क्षणार्धात रामदास बिलगली काश्याला. या दुर्घटनेत जवळ जवळ ६९० प्रवाशांनी जीव गमावला तर १५० प्रवासी वाचले. रेवसपासून तीन मैल तर पिरवाडीपासून दोन मैलावर रामदाची दुर्घटना घडली.

त्यांनी वेधले वादळी रंग…

याच वेळी रेवस, मांडवा बंदरावर अनेक कोळीबांधव मुंबईला मासे विकण्यास आपल्या बोटी घेऊन निघाले होते. मात्र वादळी रंगाचा अचूक वेध घेतल्याने त्यांनी हे रंग बदलल्यानंतर आपल्या बोटी सागरात लोटल्या. काशाच्या खडक परिसरात कुणाचे सामान तर अनेकजण आपला जीव वाचवताना धडपडत होते. या बांधवांनी बोटीतील मच्छी सागरात टाकून अनेकांचे प्राण वाचवले. त्यानंतर दुपारी १ च्या दरम्यान त्यांना घेऊन हे बांधव रेवसला पोहोचले व त्यांनी या घटनेची खबर मुंबईला दिली. या घटनेच्या दोन दिवसापूर्वी प्रवास केलेल्या शंकर विष्णू कुटे यांनी बोट वादळाच्या तडाख्यातून बाहेर पडल्याची माहिती दिली. तसेच अलिबागच्या धोकवडेस्थित ज्येष्ठ साहितिक स्व. गंगाधर गाडगीळ यांनीही या बोटीतून चार दिवसापूर्वी प्रवास करताना, बोट तिरपी चालत असल्याचे मत मांडले होते. अर्थात बोटीची जलस्थिरता पातळी (स्टेबिलिटी) ढळली असावी याशिवाय कप्तान सुलेमान इब्राहिम यानीही उद्या (या दिवशी) बोट फेरी नेणार नसल्याचे कंपनीला सांगितल्याचे वास्तव उघड होत आहे. त्यामुळे बोट कंपनीची अक्षम्य चूक तसेच नैसगिक चक्रात रामदास दुर्घटनाग्रस्त झाल्याचे समोर येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here