शिरगाव; संतोष साळसकर : ढोलताशांच्या गजरात व भल्ली भल्ली भावयच्या जल्लोषात शिवकालीन परंपरा लाभलेला भावई उत्सव देवगड तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या साळशी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी हा उत्सव आषाढ महिन्याच्या कर्क संक्रातीच्या दिवशी भावई उत्सव साजरा करण्यात येतो. या उत्सवाला वरुणराजाने अधून मधून हजेरी लावली होती.

या दिवशी सकाळी भावई देवीची पूजा झाल्यानंतर दुपारी गावातून देवीला नैवेद्य दाखवण्यात येतो. त्यानंतर दुपारी बारा पाव मानकरी ग्रामस्थ एकत्र जमून भावई देवीकडे या उत्सवाला सुरवात करून श्री पावणाई देवालयासमोर ढोल ताशाच्या गजरात व भल्ली भल्ली भावई म्हणत जल्लोषमय, भक्तिमय, वातावरणात भावई खेळली जाते. यामध्ये लहानथोर मंडळी मोठया उत्साहात सहभागी होतात. यावेळी एकमेकास चिखल लावला जातो. तसेच होळदेव येथील मोठा दगड प्रत्येकजण दोन्ही हाताची योग्य पकड देऊन वर उचलून शक्ती प्रदर्शन केले जाते. त्यानंतर जमिनीत खोल चिखलात पुरण्यात आलेला नारळ हस्त कोशल्याने काढण्यास प्रत्येक जण प्रयत्न करताना दिसतात. त्याला ‘सापड खेळणे’ असे म्हणतात. त्यानंतर सर्वजण चौऱ्याऐंशीच्या चाळ्यावर जाऊन नवस बोलणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम करतात. यानंतर पुन्हा सर्वजण श्री पावणाई देवालया समोर एकत्र येऊन काल्पनिक शिकारीचा खेळ खेळला जातो. त्यानंतर शिवकळ (अवसर) काढण्याची कला सादर करतात. या शिवकळेकडे शिकार मानवून शिकारीचे मुंडके (प्रतिकात्मक आंब्याचा टाळ) ढोलताशाच्या गजरात मिराशी कुटुंबियांकडे नेला जातो. तिथे त्याची पूजा करून भोजनाचा कार्यक्रम होतो. या उत्सवापासून श्री पावणाई देवीच्या वार्षिक उत्सवाला सुरुवात होते.

या दिवशीच्या आदल्या दिवशी सायंकाळी देसरुढ काढण्यात येते. शेती हंगाम असून देखील शेतकऱ्यांना विरंगुळा व आनंद देणारा भावई उत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात येतो.

हेही वाचा : 









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here