
कुडाळ: पुढारी वृत्तसेवा: कुडाळ तालुक्यात आज (दि.१८) दिवसभर पावसाचा जोर होता. कर्ली नदी दुथडी भरून वाहू लागली. माणगाव खोर्यातील ब्रिटिशकालीन आंबेरी पूल व दुकानवाड कॉजवेवर पाणी आले आहे. यावर्षी आंबेरी येथे पर्यायी पूल बांधल्याने प्रतिवर्षी प्रमाणे होणारी गैरसोय टळली आहे. पण दुकानवाड कॉजवेवर पाणी आल्याने वसोली, शिवापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक खोळंबली. प्रवाशांसह शाळकरी मुलांचे हाल झाले.
गेले दोन दिवस पावसाची उघडीप होती. मात्र, आजपासून पावसाने जोर धरला आहे. सकाळच्या सत्रात पावसाचा जोर काहीसा कमी होता. मात्र, मंगळवारी दुपारनंतर पावसाने जोर धरला, त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले. कुडाळ शहरात उद्यमनगर, पोस्ट ऑफीस रस्त्यावरून गटरचे पाणी वाहू लागले. त्यामुळे वाहनधारक पादचार्यांना ये-जा करताना कसरत करावी लागली. नगरपंचायतीने केलेली गटर सफाई केवळ धूळफेक होती की काय? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
आंबेरी व दुकानवाड कॉजवे पाण्याखाली
कर्ली नदीवर असलेला ब्रिटिशकालीन आंबेरी पूल, दुकानवाड कॉजवे सायंकाळी पाण्याखाली गेला. त्यामुळे माणगाव ते शिवापूर मार्गावरील वसोली, आंजिवडे, उपवडे, सार्किर्डे, शिवापूरकडे जाणारी वाहतूक पूर्णतः बंद झाली. एसटी वाहतूक बंद राहिली. त्यामुळे पायपीट करत प्रवाशांसह शाळकरी मुलांना घर गाठावे लागले.
हेही वाचा