साडवली, पुढारी वृत्तसेवा : संगमेश्वर तालुक्याला बुधवारी (दि.१९) दिवसभर मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील आरवली येथील पूल वाहतुकीसाठी काहीकाळ बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे महामार्गावरची काहीवेळ वाहतुक ठप्प झाली होती. माखजन बाजारपेठेत पाणी भरले तर संगमेश्वर बाजारपेठेला पुराचा धोका निर्माण झाला होता. फुणगूस खाडीभागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होवून जनजीवन विस्कळीत झाले होते.

हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या नुसार बुधवारी सकाळपासूनच पावसाला सर्वत्र जोरदार सुरूवात झाली होती. संगमेश्वर तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर मुसळधार पावसाने कहर करत तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील शास्त्री, सोनवी, बावनदी, काजळी, गडनदी दुथडी भरून वाहत होत्या. तर नदी-नाले ओसंडून वाहत होते.

दिवसभर धो-धो पडणाऱ्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील आरवली येथे गडनदीचे पाणी महामार्गावर आल्याने प्रथम वाहतुक एकेरी सुरू करण्यात आली होती. मात्र गडनदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने महामार्गावरील आरवली येथील पूल काहीकाळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे महामार्गावरची वाहतुक काहीकाळ ठप्प झाली होती. पाणी ओसरल्यानंतर वाहतुक पुर्ववत सुरू झाली. तसेच माखजन बाजारपेठेत पाणी भरले तर संगमेश्वर बाजारपेठेला पुराचा धोका निर्माण झाला. देवरूख-मार्लेश्वर मार्गावरील कासारकोळवण विठाबाई बस थांब्याजवळील मोरीवर बावनदीचे पाणी आल्याने वाहनचालक वाहन पुढे नेण्यास धजावत नव्हते. दरम्यान बुधवारी दिवसभर बरसलेल्या पावसामुळे लावणीच्या कामांनी वेग घेतला असून बळीराजा मात्र सुखावला आहे.

हेही वाचलंत का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here