
कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : कुडाळ तालुक्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका गुरूवारी कोकण रेल्वेला बसला. कुडाळ शहरातील कुंभारवाडी येथे रेल्वे ट्रॅक वर पाणी आल्याने खबरदारीच्या दृष्टीने कोकण रेल्वे मार्गावरून धावणा-या काही गाड्या कुडाळ, झाराप व सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. ट्रॅक लगतचे पाणी ओसरल्यावर थांबवून ठेवण्यात आलेल्या रेल्वे गाड्या मार्गस्थ करण्यात आल्या. दरम्यान कोकण रेल्वेची वाहतूक सायंकाळपासून पूर्ववत सुरू करण्यात आल्याची माहीती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
गुरूवारी सकाळपासून सर्वत्र धो धो पाऊस कोसळत असून कुडाळ तालुक्यात ठिकठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली असतानाच कुडाळ कुंभारवाडी नजिक कोकण रेल्वेच्या ट्रॅकजवळ पाणी आले. त्यामुळे कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत झाली. दुपारी दोन वाजताच्या सुमारास तेथील रेल्वे ट्रॅक जवळ पाणी आले. त्यामुळे खबरदारीच्या दृष्टिने मुंबईहून गोव्याकडे व गोव्याहून मुंबई कडे जाणा-या चार रेल्वे गाड्या कुडाळ, झाराप व सावंतवाडी रेल्वे स्थानकात थांबवून ठेवण्यात आल्या. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. बराच कालावधी झाला तरी रेल्वे गाड्या मार्गस्थ होत नसल्याने काही लोकांनी गाडीतून उतरून पर्यायी मार्ग स्वीकारला. दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी आलेले नसून ट्रॅकच्या जवळ पाणी आल्याने खबरदारीच्या दृष्टीने या रेल्वेगाड्या थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. पाणी ओसरल्यावर थांबवून ठेवण्यात आलेल्या गाड्या मार्गस्थ करण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वेची सेवा सुरळीत सुरू असल्याची माहीती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.