दोडामार्ग; पुढारी वृत्तसेवा तालुक्यात सध्या मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे तिलारी धरणातील पाणलोट क्षेत्रात झपाट्याने वाढ होऊन धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. आज (शनिवार) सकाळच्या सुमारास धरणाच्या चारही दरवाजातून विसर्ग सुरू असून, सुमारे २ हजार लीटर प्रति सेकंद (२ क्युमेक्स) पाणी बाहेर पडत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. परिणामी सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील मुख्य व मोठे असलेल्या तिलारी धरणातील पाणी पातळीत कमालीची वाढ होत आहे. मुसळधार पावसामुळे धरणाच्या सभोवताली असलेल्या डोंगरातून मोठ्या प्रमाणात पाणी धरणात जमा होते. मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळाधार पर्जण्यवृष्टीमुळे धरणातील पाणीपातळीत २४ तासांत किमान ३ ते ४ मीटरची झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे हे धरण शनिवारपर्यंत भरून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता तिल्लारी पाटबंधारे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. याबाबत त्यांनी नोटीसही काढली.

शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास धरणाची पाणी पातळी १०३.९५ मीटर झाली होती. तर धरणाची सांडवा माथा पातळी १०६.७० मीटर झाल्यास पाण्याचा विसर्ग केला जातो. शनिवारी सकाळी या पातळीत वाढ होऊन सांडवा माथा पातळी ओलांडली व धरणाच्या चारही दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला. सध्या २ क्युसेक्स प्रति सेकंद पाणी धरणातून बाहेर पडत आहे. बाहेर पडलेले हे पाणी पुच्छकालव्याद्वारे तिलारी नदीला येऊन मिळत असल्याने तिलारी नदी पात्रातील पाण्यातही कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

हेही वाचा : 









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here