
[adning id=”1976″]
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : दोन महिन्यांच्या बंदी कालावधीनंतर खोल समुद्रातील मच्छीमारीला मंगळवार 1 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मात्र वातावरण पोषक नसल्याने यांत्रिकी नौका सध्या सिंधुदुर्गात देवगड तर रत्नागिरीतील मिरकरवाडा तसेच दापोलीतील हर्णै, जयगड आदी प्रमुख बंदरातच उभ्या आहेत तर कांडाळीद्वारे मच्छीमारी करण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्याद़ृष्टीने मच्छीमार तयारीला लागल्याचे चित्र दिसत आहे. पावसाळी तसेच समुद्र खवळलेल्या स्थितीत असलेल्या वातावरणामुळे यांत्रिकी नौकांद्वारे मच्छीमारी सुरू होण्यास आणखी काही दिवस लागतील. 15 ऑगस्टनंतरच यांत्रिकी नौकांद्वारे मच्छीमारीस सुरुवात होण्याची शक्यता मत्स्य व्यवसायिक हनिफ मेमन यांनी व्यक्त केली.
खोल समुद्रातील मच्छीमारी बंदी कालावधी 1 जून ते 31 जुलैपर्यंत होता. 1 ऑगस्टपासून समुद्रातील मच्छीमारी सुरू होत आहे. मात्र समुद्रातील वातावरण पोषक नसल्याने देवगडमधील नौकामालकांनी अद्याप किनार्यावर घेतलेल्या नौका पाण्यात लोटण्यास सुरुवात केली नसली तरी कांडाळीद्वारे मच्छीमारी करणार्या छोट्या नौका लोटण्यास सुरूवात झाली आहे. दि. 1 ऑगस्टपासून नव्या मच्छीमारी हंगामाला सुरुवात झाल्याने किनारपट्टी भाग गजबजू लागला आहे. देवगड बंदरातील समुद्रातील वातावरण पोषक नसल्याने मोठ्या नौका जरी समुद्रात मच्छीमारीसाठी जात नसल्या तरी काही प्रमाणात छोट्या नौका मच्छीमारीसाठी जाण्याचा तयारीला लागल्या असून कांडाळीद्वारे मच्छीमारी व्यवसाय सुरू होण्याची शक्यता आहे.
सध्या समुद्र खवळलेला असून लाटांचे तांडव आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत खोल समुद्रातील मच्छीमारी करणे अशक्य असले तरी कांडाळीद्वारे सहा ते सात वावात मच्छीमारी करण्यासाठी मच्छीमार सज्ज झाला आहे. सध्या खाडीतील मच्छीमारी सुरू असून सुळा, दोडी आदी मासळी मिळते. मात्र तीही कमी प्रमाणात मिळत आहे. यामुळे दरही वधारले आहेत. 1 ऑगस्टपासून खोल समुद्रातील मच्छीमारी सुरू होत असल्याने खोल समुद्रातील बांगडा, सुरमई आदी चविष्ट मासळीचा आस्वाद चाखण्याची खवय्यांना संधी आहे. मात्र वातावरणाची स्थिती व त्यानुसार समुद्रात मच्छीमारीस जाऊन सुरू होणारी मच्छीमारी यावरच समुद्रातील मासळी बाजारपेठेत उपलब्ध होण्याची मदार आहे.
हेही वाचा :