
file photo
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सव अवघ्या दीड महिनाभरावर आल्याने मुंबईतील कोकणी चाकरमाण्यांना गावाला जाण्याचे वेध लागले आहेत. रेल्वे प्रशासनाने सोडलेल्या ज्यादा गाड्याही हाऊसफुल्ल झाल्याने विशेष गाड्या करून मुंबई-गोवा महामार्गाचा रस्ते प्रवास करून गाव गाठण्याच्या मनःस्थितीत असलेल्या चाकरमान्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे. मुंबई- गोवा महामार्गावरील खड्ड्यांचे विघ्न दूर होणार असून, मुंबईकरांचा कोकण प्रवास खड्डेमुक्त अर्थातच निर्विघ्न पार पडणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दंड थोपाटले आहेत.
इंदापूर ते झारापदरम्याप सुमारे 350 किलो मीटरच्या मार्गावर केवळ दीड किलोमीटरच्या मार्गावर खड्डे बाकी आहे. हे खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या काही दिवसांत तेही खड्डे बुजवले जाणार असून, खड्डेमुक्त रस्ता तयार केला जाईल अशी हमीच महामार्ग प्राधिकरणाने उच्च न्यायालयाला दिली आहे. त्यामुळे कोकणी चाकरमान्यांची लवकरच मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांच्या त्रासातून सुटका होण्याची शक्यता आहे.
मुंबई-गोवा महामार्गा (एनएच-66) चौपदरीकरणारा होणारा विलंबआणि मोठ्या प्रमाणावर पडलेल्या खड्यांच्या पार्श्वभूमीवर मुळचे कोकणातील असलेले अॅड. ओवेस पेचकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका केली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर दरवर्षीच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडतात. महामार्गाची योग्य पद्धतीने देखभाल केली जात नसल्यामुळे खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होते. याचबरोबर महामार्गाच्या चौपदरीकरणाची कासवगती, प्रवासी सुरक्षेच्या उपाययोजनांची कमतरता आहे, याकडे याचिकेतून न्यायालयाचे लक्ष वेधले आहे.
मागील सुनावणीच्यावेळी न्यायालयाने इंदापूर ते झाराप या मार्गावरील रस्त्याची दुरावस्था प्रत्यक्ष जाऊन पाहण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते.त्यानुसार महामार्ग प्राधिकरण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी महामार्गाची सद्यस्थिती जाणून घेतली. त्या पाहणीत आलेली परिस्थिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रतिज्ञापत्राद्वार सादर केली आहे. इंदापूर ते झारापदरम्यानच्या 350 किमीच्या मार्गावर सद्यस्थितीत एकही खड्डा नाही. उर्वरित केवळ दीड किलोमीटर अंतरावर खड्डे आहेत. तेही लवकरच बुजवले जातील, अशी हमी देणारे प्रतिज्ञापत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने न्यायालयात दाखल केले आहे. यायाचिकेवर 9 ऑगस्टला सुनावणी होणार आहे.