चिपळूण ः येथील जयपूर फूट शिबिरात अनेक गरजू दिव्यांग येताना दुसऱ्याच्या आधाराने आले. त्यांना जयपूर फूट बसविल्यानंतर आधाराविना स्वतः चालत गावी परतल्याचा आनंद शिबिरात सहभागी झालेल्या दिव्यांगांना मिळाला.
येथील डाऊ केमिकल्स इंटरनॅशनल, भगवान महावीर विकलांग समिती व फ्रीडम फॉर यू या संस्थांच्यावतीने तीन दिवसीय मोफत जयपूर फूट शिबिर घेण्यात आले. मागील काही वर्षापासून सातत्याने या शिबिरात येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेषतः मधुमेहामुळे अनेक रुग्णांवर पायाची जखम बरी होत नसल्याने पाय कापावा लागतो. त्यांना जयपूर फूटची आवश्यकता अधिक असते. वृद्धांनाही चालण्यासाठी आवश्यक त्या साहित्याची गरज असते. या वर्षी अशा प्रकारच्या रुग्णांची संख्या मोठी होती. रुग्णांच्या शारीरिक गरजेनुसार काठी, कुबडी, कॅलिपर, जयपूर फूट, व्हीलचेअर आदींचे वितरण करण्यात येते. प्रत्येक व्यक्तींची नोंदणी करून तपासणी केली जाते. त्यानंतर या रुग्णाला जयपूर फूट बसवायचे असेल तर त्याची योग्य मापे घेऊन जयपूर फूट तयार करून देण्यात आले.
हे पण वाचा – गाजलेल्या नाराजीनाट्यामुळे यांच्या पालकमंत्रीपदाला हुलकावणी
या प्रमाणे मागील तीन दिवसात चिपळूण, सिंधुदुर्ग, रायगड, दापोली, कुडाळ, रत्नागिरी, कोल्हापूर आदी भागातून रुग्णांनी शिबिराला हजेरी लावली. शिबिरासाठी असलेल्या तज्ञांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना हव्या असलेल्या साहित्याचे वाटप केले. अजूनही अनेक गरजू शिबिरात पोचू न शकल्याने त्यांच्यासाठी नवी मुंबई, काचेची शाळा क्र. 48, ऐरोली नवी मुंबई येथे 21 ते 24 जानेवारी या कालावधीत शिबिर होणार आहे. केईएम हॉस्पिटल येथे भगवान महावीर विकलांग समितीच्या कार्यालयात कायमस्वरुपी केंद्रात जयपूर फूट दिले जात असल्याचे सांगण्यात आले.
हे पण वाचा – राणेंवर दबाव ठेवण्यासाठी रत्नागिरीत सामंत अस्त्र
मांजरेकर यांनी मित्रालाही केले पायावर उभे
दापोली तालुक्यातील मोहन मांजरेकर यांना जयपूर फूट बसविल्यानंतर ते लगेचच गावी परतले. त्यांनी गावी जाऊन त्यांचे स्नेही मधुकर कांदेकर यांना शिबिराला घेऊन आले. कांदेकर यांच्या दोन्ही पायांना जयपूर फूट बसविल्याने ते देखील स्वतः चालू लागले.
शिबिरातील वाटप
कुबड्या- 37
काठी- 4
एल्बो- 25
व्हीलचेअर- 6
वॉकर- 5
कॅलिपर- 73
जयपूर फूट- 81
|