रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  यांत्रिकी मासेमारी सुरू होऊन दहा दिवस उलटले, तरी अपेक्षित प्रमाणात मासळी अजून मिळत नसल्याने नौका मालक हवालदिल झाले आहेत. आता 1 सप्टेंबरपासून पर्ससीननेट मासेमारी सुरू होत असून त्यासाठी पर्ससीननेट नौकांची डागडुजी सुरू झाली आहे. समुद्रात जाऊन प्रत्यक्ष मासेमारी होण्यापूर्वीच नौकांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी प्रत्येक नौका मालकांना 2 ते 3 लाख रुपयांचा फटका बसला आहे. पावसाळी मासेमारी बंदी काळात मिरकरवाडा बंदरावर उभ्या करून ठेवलेल्या अनेक नौका लाटा आणि वार्‍याच्या मार्‍यामुळे एकमेकांवर आदळून फुटल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्याला 167 कि.मी. समुद्रकिनारा लाभला आहे. या समुद्रात जिल्ह्यातील सुमारे 281 पर्ससीननेट नौका मासेमारी करण्यास जातात. मिरकरवाडा आणि साखरीनाटे बंदरात उभ्या राहणार्‍या पर्ससीननेट नौकांचे प्रमाण अधिक आहे. पावसाळी मासेमारी बंदी काळात या नौका बंदरात उभ्या केल्या जातात. मिरकरवाडा बंदर आता नौका शाकारून ठेवण्यासाठी अपूरे पडत आहेत. त्यामुळे खेटून उभ्या असलेल्या पर्ससीन नौका वारा आणि लाटांच्या मार्‍यामुळे एकमेकांवर आदळून दरवर्षी अनेक नौकांचे नुकसान होते. दि. 1 सप्टेंबरपासून मासेमारी सुरु होण्यापूर्वीच ही दुरुस्ती आणि इतर देखभालीची कामे करून घ्यावी लागतात. पर्ससीननेट नौकांची या डागडुजीसाठी जोरदार तयारी सुरु झाली आहे.

पर्ससीननेट मासेमारीसाठी नौका सज्ज केल्या जात आहेत. यामध्ये इंजिनचे काम, रंगरंगोटी करून घेण्यासाठी नौकामालकांची धावपळ सुरु आहे. त्याचबरोबर तांडेल, खलाशी शोधावे लागत आहेत. एका नौकेसाठी 35 ते 40 तांडेल, खलाशी दरवर्षी शोधून आणावे लागतात. त्याचबरोबर या नौकांवरील जाळ्यांची दुरुस्तीही केली जात आहे. या सर्व मासेमारीपूर्व देखभाल दुरुस्तीसाठी प्रत्येक नौकामालकाला 2 ते 3 लाख रुपये खर्च करावा लागत आहे.

दरम्यान, यांत्रिकी मासेमारी 1 ऑगस्टपासून सुरु झाली असली तरी या नौकांना अपेक्षित प्रमाणात अद्यात मासळी मिळालेली नाही. समुद्रातील वातावरण शांत आणि मासेमारी करणार्‍या नौकांना समुद्रात जाण्यासाठी पोषक आहे. परंतू समुद्राचे पाणी अजूनही थंड असल्याने दूरवर स्थलांतरीत झालेला मासा जिल्ह्याच्या समुद्राकडे परतलेला नाही.

मासेमारीसाठी अनुकूल वातावरण नाही

समुद्रातील पाण्याचे तापमान वाढल्यानंतर पाण्यावर विशिष्ट प्रकारचा तवंग येतो. या तवंगाकडे लहान मासा आकर्षित होतो आणि या लहान माशांपाठोपाठ मोठा मासा येतो, तेव्हा मच्छीमार नौकांना मासळी मिळण्याचा रिपोर्ट चांगला असतो. परंतु, अद्याप जिल्ह्याच्या समुद्र क्षेत्रात अशी पोषक परिस्थिती निर्माण झालेली नाही. त्यामुळेच 1 ऑगस्टपासून सुरू झालेल्या नौकांना मासळीचा चांगला रिपोर्ट मिळालेला नाही.

The post रत्नागिरी : मासेमारीपूर्वीच मच्छीमारांना आर्थिक फटका appeared first on पुढारी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here